*कोरोना विषाणूच्या धास्तीमुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये
*सर्व नागरिकांनी तोंडाला मास्क लावण्याची गरज नाही
* जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही
*संशयित सातही रुग्णांचे  तपासणी अहवाल निगेटिव्ह
लातूर, दि.14:- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थान व सर्वोपचार रुग्णालयात काल दाखल झालेल्या संशयित सात ही रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आलेले असून लातूर जिल्ह्यात एकही कोरोना विषाणू बाधित रुग्ण नसल्याची माहिती संस्थानचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकही कोरोना विषाणू बाधित रुग्ण नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये व सर्वच नागरिकांनी तोंडाला मास्क लावण्याची गरज नसल्याचे आरोग्य यंत्रणेच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे
तर मास्क कोणी लावावा- परदेशातून आलेला व कोरोना पॉझिटिव्ह केस (रुग्ण), मेडिकल पर्सन (वैधकीय सेवा देणारे), रुग्णांची काळजी घेणाऱ्या  व्यक्ति (केअर टेकर), पॉझिटिव्ह केसच्या निकट संपर्कात राहणार्‍या व्यक्तींनाच मास्क लावण्याची गरज असते. मास्क लावण्याचा मूळ उद्देश हा आहे की आपल्यामुळे कोणाला कोरोना संसर्ग होऊ नये. जर स्वता:ला खरच ताप, खोकला, श्वसनास त्रास असेल तर जरूर मास्क वापरणे गरजेचे ठरते.    
मास्क वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते. नॉर्मल असताना आपण जितक्या वेळी तोंडाला स्पर्श करत नाही त्याहून कितीतरी अधिक वेळा मास्क लावल्यावर करतो. प्रत्येक वेळी मास्कला स्पर्श केल्यावर आपण काही हात धूत नाही. त्या हातावर विषाणू नसेल कशावरून? म्हणजेच नसलेले विषाणू आपण स्वता: होऊन नाकातोंडापर्यंत नेऊन सोडतो. लावलेला मास्कचा उपयोग हा फक्त 4 ते 6 तासापर्यंत होतो. त्यानंतर त्याची उपयोगिता नसते. वापरलेले मास्क हा बायोमेडीकल वेस्ट असल्यामुळे तो इस्तत: फेकून देता येत नाही त्याची योग्य विल्हेवाट लावावी लागते.
अन्यथा उपायाऐवजी अपायच होण्याचा संभव असतो. वापरलेले मास्क २ टक्के सोडीयम हायपोक्लोराईडच्या द्रावणात 10 ते 15 मिनिटे निर्जंतुक करुन मग तो जाळून टाकावा लागतो. भितीपोटी, कोरोनाच्या धास्तीमुळे मिळेल त्या किमतीत लोक मास्क खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मास्क ऐवजी साधा सुती किंवा कॉटनचा स्वच्छ रुमाल चार पदरी करुन बांधला तरी चालतो. पण बाहेरून आल्यावर तो 10 ते 15 मिनिटे गरम पाण्यात ठेवून नंतर धुवावा व उन्हात वाळवावा.
हॅन्ड सॅनिटायझर्सच्या बाबतीत हेच घडत आहे. त्याचा मार्केटमध्ये तुटवडा होऊन लोक त्याची गुणवत्ता, दर्जा, उत्पादन इ. चा विचार न करता खरेदी करताना दिसत आहेत. परंतु हॅन्ड सॅनिटायझर्सच्या ऐवजी हात साबण व पाण्याने स्वच्छ धुतले तरी त्याचा फायदा तेवढाच होईल. तेव्हा जनतेने जास्त घाबरून न जाता योग्य आणि पुरेशी काळजी घ्यावी. योग्य व सकस आहार, वारंवार साबण व पाण्याने हात धुणे, खोकलताना, शिंकताना नाकावर रुमाल धरणे व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे ब कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ. गंगाधर परगे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी केले आहे.
****
      

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु