पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन
• जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
लातूर, दि. 21 : भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवार, 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.15 वाजता राष्ट्रध्वज वंदन समारंभ लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे होत आहे. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आढावा घेतला.
उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी, संगीता टकले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
ध्वजवंदनेनंतर संचलन, विविध पुरस्कारांचे वितरण, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध शासकीय विभागांमार्फत तयार करण्यात आलेले चित्ररथ यावेळी संचलनामध्ये सहभागी होणार आहेत. या अनुषंगाने सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या सर्व संबंधित विभागांनी काटेकोरपणे पार पाडाव्यात. या कामाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या.
***
Comments
Post a Comment