राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरु
राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरु
• 50 गटांच्या माध्यमातून 2 हजार 500 हेक्टरवर नैसर्गिक शेती
लातूर, दि. 14 : राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन ही योजना आत्मा कृषि विभाग लातूर यांच्यामार्फत सन 2024-2025 पासून राबविण्यात येत आहे. एक गट 50 हेक्टरचा असून एकूण 50 गटातंर्गत जिल्ह्यात 2 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर कार्यक्रम हा राबविण्यात येत आहे.
सेंद्रिय शेती कार्यक्रमातंर्गत शासनाकडून सेंद्रिय शेती पध्दतीची अंमलबजावणी करण्यासाठी विविध घटकांसाठी अनुदान देण्यात येते. गटांमधील शेतकऱ्यांनी समन्वयाने राबविलेल्या कार्यक्रमाच्या नोंदी ठेवून सर्व माहिती संकेतस्थळावर भरण्यासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाते. सेंद्रिय शेतीच्या धरतीवर सन 2024-2025 या वर्षामध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन राबविण्यात येत आहे.
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनची जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी केली जात आहे. नैसर्गिक शेती ही पशुधन आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध संसाधनावर आधारित आणि भारतीय परंपरेत रुजलेली रसायनमुक्त शेती पध्दती आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे, बाह्य निविष्ठा खरेदी न करणे, निसर्गावर आधारित शाश्वत शेतीप्रणाली विकसित करणे, मातीचे आरोग्य आणि सुपीकता पुनरुज्जीवीत करणे, पाण्याची गुणवत्ता वाढविणे, जैवविविधता जतन करणे आणि शेतकरी, त्यांचे कुटूंब आणि ग्राहकांना सुरक्षित, आरोग्यदायी आणि पौष्टीक अन्न पुरविणे हे या मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे आत्माचे प्रकल्प संचालक शिवसांब लाडके यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment