कुक्कूट प्रक्षेत्र, घोड्याचे तबेले,वराह प्रक्षेत्रांची पशुसंवर्धन विभागाकडे नोंदणी करावी
कुक्कूट प्रक्षेत्र, घोड्याचे तबेले,वराह
प्रक्षेत्रांची पशुसंवर्धन विभागाकडे नोंदणी करावी
लातूर,दि.24 (जिमाका)- जिल्ह्यातील खाजगी अंडी उत्पादन व मांसल कुक्कुट पक्षी उत्पादन करणाऱ्या सर्व लहान व मोठे कुक्कुट प्रक्षेत्र, घोड्याचे तबेले व वराह प्रक्षेत्राची नोंद लातूर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडे करणे आवश्यक आहे.
घोड्यामध्ये ग्लॅडर्स (Glanders), कुक्कुट व इतर पक्ष्यांमध्ये एव्हियन इन्प्ल्युएंझा (Avian influenza) व वराह प्राण्यामध्ये अफ्रिकन स्वाईन फिव्हर या सारखे संसर्गजन्य व घातक रोग प्रादुर्भाव निदर्शानास येतात. बर्ड प्ल्यु आणि अफ्रिकन स्वाईन फिव्हर या रोग प्रादुर्भावामध्ये अनुक्रमे कुक्कुट व इतर पक्षी आणि वराह प्राण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मरतुक दिसून येते, तर घोड्यांना ग्लॅडर्स रोग प्रादुर्भाव झाल्यानंतर असे बाधित घोडे शास्त्रोक्त पध्दतीने मारले जातात.
या तिन्ही रोग प्रादुर्भावामध्ये जाणीवपूर्वक नष्ट केलेले घोडे, कुक्कुट व इतर पक्षी, पक्षीखाद्य, अंडी आणि वराह प्राणी यांसाठी केंद्र पुरस्कृत ॲस्कॅड या योजनेमध्ये अर्थसहाय्य देय असून याचे दर केंद्र शासनाकडून निश्चित करण्यात येतात. या अंतर्गत केंद्र शासनाचा 50 टक्के हिस्सा व उर्वरित 50 टक्के राज्य शासनाच्या हिश्याचा समावेश आहे.
जिल्ह्यातील खाजगी अंडी उत्पादन करणारे तसेच,मांसल कुक्कुट पक्षी उत्पादीत करणारे प्रक्षेत्तर घोड्यांचे तबेले तसेच वराह पालन प्रक्षेत्रांची नोंद जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचेकडे करणे आवश्यक आहे. प्रक्षेत्र नोंद करण्यासाठी 50 रुपये शुल्क आकारण्यात येते. तरी संबधीत पशुपालकांनी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधून विहित नमुन्यातील अर्ज भरावा व आपल्या प्रक्षेत्राची नोंद तात्काळ करुन घ्यावी, असे अवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
****
Comments
Post a Comment