लातूर येथे राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन
शाळा, महाविद्यालयांमध्ये वाहतूक नियमांचे
धडे देण्यासाठी मोहीम राबवावी-जिल्हाधिकारी वर्षा
ठाकूर-घुगे
·
आपत्कालीन सेवांचे टोल फ्री क्रमांकांविषयी जनजागृती करावी
·
रस्ते सुरक्षा रथाद्वारे जिल्ह्यात होणार जनजागृती;
जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी
·
रस्ता सुरक्षा नियमांचे संवेदनशीलपणे पालन करा; स्वतःसोबत
इतरांचीही काळजी घ्या
लातूर, दि. ०८ : रस्ते अपघातामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी
करण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन आवश्यक आहे. त्यामुळे वाहतूक नियमांविषयी
जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतूक
नियमांचे धडे दिले जावेत. त्यांना आपत्कालीन सेवांची आणि त्यासाठी असलेल्या टोल
फ्री क्रमांकाची माहिती द्यावी. यासाठी शिक्षण विभाग, वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक
परिवहन कार्यालयाने संयुक्तपणे मोहीम हाती घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा
ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या. राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या
उद्घाटनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता
डॉ. सलीम शेख, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त
मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा
नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र
निळकंठ, गणेश क्षीरसागर अलका डाके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशिषकुमार अय्यर,
शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
अपघाती मृत्यूच्या घटना पाहिल्यानंतर आपण काही काळ गांभीर्याने वाहतूक
नियमांचे पालन करतो. वाहने चालविताना काळजी घेतो. मात्र, काही काळानंतर पुन्हा या नियमांकडे
आपले दुर्लक्ष होते. हे दुर्लक्ष अपघाताचे कारण ठरू शकते. त्यामुळे प्रत्येक
व्यक्तीने रस्त्यावर वाहन चालविताना रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन
करावे. आपल्या स्वतःसोबत रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाची काळजी घ्यावी. अपघाती
मृत्यूमुळे कुटुंबातील सदस्य गमाविल्यानंतर त्या कुटुंबाची मोठी हानी होते.
त्यामुळे प्रत्येकाने अतिशय संवेदनशील राहून वाहतूक नियमांचे पालन करावे. तसेच
रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना विनाविलंब मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन
जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले.
आपल्या देशात दर ४५ मिनिटांना सरासरी २४ व्यक्तींचा अपघाती मृत्यू होतो, तर
दरवर्षी सुमारे २ लाख व्यक्ती अपघातात जीव गमावितात. इतर कारणांमुळे होणाऱ्या
मृत्यूंच्या तुलनेत हे प्रमाण खूप जास्त आहे. तरीही आपण याकडे गांभीर्याने पाहत
नाही. रस्ते सुरक्षेसाठी प्रशासकीय पातळीवरून होणाऱ्या प्रयत्नांना समाजातून साथ
मिळाल्यास अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने
वाहतूक नियमांच्या पालनाची सुरुवात स्वतःपासून करून अपघाताचे प्रमाण कमी
करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी
केले.
रस्त्यावर वेगाने वाहने चालविल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते. त्यामुळे
प्रत्येकाने वाहनावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीमार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे
२०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे सार्वजनिक बांधकाम
विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख यांनी सांगितले.
रस्ते सुरक्षा विषयक नियमांची उजळणी होण्यासाठी राज्य रस्ता सुरक्षा अभियान
राबविण्यात येत आहे. ‘परवाह’ अर्थात ‘काळजी’ ही थीम घेवून य अभियानामध्ये जनजागृती
करण्यात येत आहे. रस्त्याचा वापर करताना प्रत्येक वाहनचालकाने परस्परांची काळजी
घ्यावी, असा यामागील उद्देश आहे. इच्छितस्थळी वेगाने पोहोचण्यापेक्षा इच्छितस्थळी
सुरक्षित पोहचाण्याला सर्वांनी प्राधान्य देण्याची गरज आहे, असे प्रादेशिक परिवहन
अधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितले.
वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे अपघाताला कारणीभूत आहे. त्यामुळे अशा
व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यासोबतच त्यांचे मोबाईल जप्त करण्यासारखी शिक्षा
दिली जावी, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशिषकुमार अय्यर
यांनी राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्देश विशद केला. शहर वाहतूक शाखेचे पोलीस
निरीक्षक गणेश कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले. महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक
महामंडळात विना अपघात सेवा देणाऱ्या वाहनचालकांचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच
यावेळी उपस्थितांना रस्ता सुरक्षा विषयक नियमांचे पालन करण्याबाबत शपथ देण्यात
आली.
रस्ते सुरक्षा रथाला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी
झेंडी
राज्य रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त जिल्ह्यात रस्ते सुरक्षा नियमांविषयी
जनजागृती करण्यासाठी लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रस्ते सुरक्षा रथ
तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय
मुंडे यांच्या हस्ते या रथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. तसेच राज्य रस्ते
सुरक्षा अभियान उद्घाटन कार्यक्रमामध्ये रस्ते सुरक्षा नियमांविषयी माहिती
देणाऱ्या विविध पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.
*****
Comments
Post a Comment