प्रजननक्षम पशुधनासाठी कृत्रिम रेतनाची सुविधा देण्याकरिता पशुसेवकांनी पशुसंवर्धन विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक
प्रजननक्षम
पशुधनासाठी कृत्रिम रेतनाची सुविधा
देण्याकरिता पशुसेवकांनी
पशुसंवर्धन विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक
लातूर, दि. 21 : जिल्ह्यात प्रजननक्षम पशुसाठी
कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कृत्रिम रेतन करणारे खाजगी पशुसेवक
(तंत्रज्ञ) मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. जिल्ह्यातील सर्व खाजगी कृत्रिम रेतन
सेवा पुरविणाऱ्या पशुसेवकांनी (तंत्रज्ञ), गोठीत रेतमात्रा वितरक, रेत बँक यांनी
लातूर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचेकडे नाव नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी कळविले आहे.
कृत्रिम रेतन (एआय)
तंत्रज्ञ म्हणून नोंदणी करण्यासाठी भारतीय पशुवैद्यक परिषदेने मान्यता दिलेल्या
विद्यापीठामधून पशुवैद्यक शास्त्रामधील पदवी, भारत सरकारच्या मैत्री (ग्रामीण
भारतातील बहुपयोगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञान) चे प्रशिक्षण घेतलेले असावे. तसेच
इयत्ता दहावी उत्तीर्ण किंवा त्याच्याशी समकक्ष असणारी परीक्षा उत्तीर्ण आणि
महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्थेमधून कृत्रिम रेतन
तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेली, पशुसंवर्धन क्षेत्रातील किमान
एक वर्षाचा अनुभव आहे किंवा जिने कृत्रिम रेतानाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, अशी पशुसखी कृत्रिम
रेतन (एआय) तंत्रज्ञ म्हणून नोंदणी करण्यासाठी पात्र असेल.
महाराष्ट्र गोजातीय
प्रजनन (विनियमन) अधिनियम 2024 अंतर्गत कृत्रिम रेतनाची सेवा देणाऱ्या पशुसेवकांना
(तंत्रज्ञ), गोठीत रेतामात्रा वितरकांना, रेत बँक यांनी
लातूर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय यांच्याकडे तातडीने आपली नोंदणी व
नोंदणी नूतनीकरण करून घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. यानुसार पात्र व्यक्तींची
पाच वर्षांसाठी नोंदणी प्रमाणपत्र व दर पाच वर्षांनी नोंदणी नूतनीकरण करण्यात
येईल. याबाबतचे सविस्तर आदेश राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून महाराष्ट्र
गोजातीय प्रजनन (विनियमन) अधिनियम 2024 मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत.
याअनुषंगाने काही अडचणी असल्यास आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेकडे संपर्क
साधावा, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शिंदे यांनी
प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
******
Comments
Post a Comment