‘उल्लास’ मेळाव्यातील मंथनामुळे विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण मिळण्यास मदत होईल -जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
·
नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत विभागीय, जिल्हा मेळावा
·
लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यातील नव साक्षर, शिक्षकांचा
सहभाग
लातूर, दि. ०८ : नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत उल्लास मेळाव्यातील
शिक्षणाविषयी सखोल मंथन विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण मिळण्यासाठी उपयुक्त ठरेल,
असा विश्वास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला. नव भारत साक्षरता
कार्यक्रमांतर्गत विभागीय व जिल्हास्तरीय उल्लास मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या
बोलत होत्या. पेठ येथील किडीज इन्फो पार्क स्कूल येथे हा मेळावा आयोजित करण्यात
आला होता.
जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय
शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग, विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. भागिरथी गिरी,
शिक्षणाधिकारी माध्यमिक नागेश मापारी, शिक्षणाधिकारी योजना तृप्ती अंधारे, नांदेडचे
शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, धाराशिवचे उपशिक्षणाधिकारी श्री. काझी, प्राचार्य
डी.एन. केंद्रे, किडीज इन्फो पार्कच्या प्राचार्य प्रीती शहा यांच्यासह लातूर
जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी, लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यातील शिक्षक,
विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
आपल्या समाजातील प्रत्येक
व्यक्तीला अक्षरांची ओळख असणे गरजेचे आहे. त्यामुळे नव भारत साक्षरता कार्यक्रमात
शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेवून १५
वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला साक्षर बनविण्यासाठी प्रयत्न करावेत. उल्लास
मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या शिक्षकांनी अतिशय कलात्मक पद्धतीने शिक्षणाचे महत्व
विविध कलाकृतीतून मांडले आहे. त्यामुळे निरक्षर, नव साक्षरांना शिक्षणाचे महत्व
पटण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या. तसेच या उपक्रमात
सर्वांनी संवेदनशीलपणे प्रयत्न करून निरक्षरांना साक्षर करावे, असे आवाहन त्यांनी
केले.
प्रत्येक व्यक्तीला अक्षर ओळख व्हावी; प्रत्येक घरावर महिलेच्या नावाची पाटी लावावी
मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी नुकताच १०० दिवसात करावयाच्या कामांच्या अनुषंगाने प्रशासनला सूचना
दिल्या आहेत. त्यानुसार नव भारत साक्षरता कार्यक्रमामध्ये पुढील १०० दिवसात
जिल्ह्यातील जास्तीत जास्त निरक्षर व्यक्तींना अक्षरांची ओळख होण्यासाठी विविध
उपक्रम हाती घ्यावेत. येत्या काही दिवसात जिल्ह्यातील प्रयेक व्यक्तीला अक्षराची
ओळख करून देण्यासोबतच प्रत्येक घरावर महिलेच्या नावाची पाटी लावण्यासाठी सर्वांनी
पुढाकार घ्यावा. महिलांच्या सन्मानासाठी आपल्या कुटुंबातील आई, मुलगी, पत्नी
यांच्या नावाची पाटी आपला घरावर लावावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
यांनी केले.
नव भारत साक्षरता
कार्यक्रमाला सुरुवातीच्या काळात काही घटकांकडून विरोध झाला. मात्र आता लातूर
जिल्ह्यात या उपक्रमाला गती मिळाली आहे. १५ वर्षांवरील नागरिकांना साक्षर
करण्यासोबतच लातूर जिल्ह्यात बोलीभाषेतून शिक्षण देण्याचा उपक्रमही राबविण्यात येत
आहे. यामध्ये तांड्या-वस्त्यांवरील शाळेत दर शनिवारी बोलीभाषेतून शिक्षणाचे वर्ग
घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर
यांनी दिली. तसेच नव भारत साक्षर कार्यक्रमांतर्गत दर्जेदार शिक्षण देण्याच्या
सूचना केल्या.
प्रास्ताविकामध्ये
योजना शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी उल्लास मेळावा आयोजनाचा हेतू, तसेच
मेळाव्याचे स्वरूप याविषयी माहिती दिली. १५ वर्षावरील सर्व नागरिकांना २०२७ पर्यंत
साक्षर बनविण्यासाठी नव भारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी
सांगितले. तसेच आपल्या आजूबाजूच्या निरक्षर नागरिकांना साक्षर बनविण्यासाठी सर्वांनी
प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन विवेक सौताडेकर यांनी केले, उदयसिंह पाटील या शिक्षकाने बोलक्या
बाहुल्याच्या मदतीने अनोख्या पद्धतीने उपस्थितांचे आभार मानले.
साक्षरता वारीमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
विभागीय व
जिल्हास्तरीय मेळाव्यानिमित्त बुधवारी सकाळी साक्षरता वारीचे आयोजन करण्यात आले
होते. जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरु झालेली साक्षरता वारी किडीज इन्फो पार्क
येथे आल्यानंतर समारोप करण्यात आला. लातूरमधील आर.एन.मोटेगावकर विद्यालय, ज्ञानप्रकाश
माध्यमिक विद्यालय, हरंगुळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,
देशिकेंद्र विद्यालय, श्री श्री रविशंकर
विद्यालय, श्री व्यंकटेश माध्यमिक विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्यालय, केशवराज विद्यालय,
ज्ञानेश्वर विद्यालय व किडीज इन्फो पार्क स्कूल या विद्यालयातील
विद्यार्थी या साक्षरता वारीत सहभागी झाले होते.
*****
Comments
Post a Comment