कामाच्या ठिकाणी महिलांकरिता सुरक्षित वातावरण निर्माण करणे प्रत्येकाची जबाबदारी-विजया रहाटकर











·         असंघटीत महिलांमध्येही कायद्याविषयी जनजागृती करावी

लातूर, दि. ०३ : प्रत्येक शासकीय, अशासकीय कार्यालयांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे. याविषयी कार्यालयातील प्रत्येक सहकाऱ्याची जबाबदारी महत्वाची असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितले. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई, निवारण) अधिनियम २०१३ अंतर्गत कार्यालयांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या अंतर्गत तक्रार निवारण समिती अध्यक्ष सदस्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, प्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जावेद शेख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

काही वेळा महिलांना कामाच्या ठिकाणी त्रासाला सामोरे जावे लागते, त्यांचा लैंगिक छळ होतो. मात्र त्या तक्रार करायला धजावत नाहीत. महिलांसाठी प्रत्येक कार्यालयात सुरक्षित वातावरण निर्माण होण्यासाठी, तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी कार्यालय प्रमुख, कार्यालयातील सहकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे श्रीमती रहाटकर म्हणाल्या. महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समित्यांची दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घ्यावी. या समितीचे सदस्य म्हणून काम करणाऱ्या प्रत्येकाने समितीला मिळालेल्या अधिकाराचा वापर करून महिलांना न्याय द्यावा. तसेच महिलांवर तक्रार करण्याची वेळ येणार नाही, असे वातावरण कार्यालयात निर्माण करावे, असे त्या म्हणाल्या. यासोबतच असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार निवारण समितीबाबत जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

लातूरमधील हिरकणी कक्ष, ‘डायल ११२’ क्यूआर कोड संकल्पना सर्वत्र राबविणार

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात तयार करण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे, तसेच पोलीस दलामार्फत शहरातील रिक्षांमध्ये लावण्यात आलेल्या ‘डायल ११२’ विषयक क्यूआर कोड उपक्रमाचे श्रीमती रहाटकर यांनी कौतुक केले. तसेच हे दोन्ही उपक्रम देशात सर्वत्र राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्रीमती विजया रहाटकर यांनी सांगितले. तसेच लातूर येथील सखी वन स्टॉप सेंटरने महिलांच्या जवळपास १ हजार तक्रारींचा निपटारा केला असून या कक्षाचे काम समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.

घराच्या पाटीवर पतीच्या नावासोबतच पत्नीचे नावही लावले जावे, यासाठी नांदेड जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना मोहीम राबविली होती. आता लातूर येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना स्वामित्व योजनेची अंमलबजावणी करून पतीच्या नावासोबत पत्नीचे नावही सातबारा, आठ अ उताऱ्यावर लावले जावे, यासाठी प्रयत्न करीत असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. यासोबतच ‘माझी मुलगी, माझा अभिमान’ अभियान राबवून आपल्या मुलीचे नाव घराच्या पाटीवर लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे, असे त्या म्हणाल्या. कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी लातूर जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती अध्यक्ष, सदस्यांच्या कार्यशाळा घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यावेळी म्हणाल्या.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांना मुलीच्या नावाची नेमप्लेट भेट

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘माझी मुलगी, माझा अभिमान’ या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांना त्यांच्या मुलीच्या नावाची आकर्षक नेमप्लेट घरावर लावण्यासाठी भेट देण्यात आली. आपल्याला मुलीचा सदैव अभिमान आहे, मात्र अद्याप तिच्या नावाची नेमप्लेट घरावर लावावी, अशी कल्पना सुचली नव्हती. मात्र, आज तिच्या नावाची नेमप्लेट भेट मिळाल्यामुळे आपल्याला मनापासून आनंद वाटल्याचे आणि आनंदाने गहिवरून आल्याचे श्रीमती रहाटकर यांनी यावेळी नमूद केले. तसेच यासारख्या उपक्रमांमुळे मुलींच्या मनात आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले.

प्रारंभी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख यांनी अंतर्गत समिती कामकाजाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे यांनी केले. तत्पूर्वी श्रीमती रहाटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील हिरकणी कक्षाची पाहणी केली. तसेच येथील सुविधांबाबत कौतुक केले. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलींचा, महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये सृष्टी सुधीर जगताप, अनिता दिलीप कुलकर्णी, अयोध्या शिवशंकर गुंजीटे, पटसाळगे रुक्मिणी गणेश यांचा समावेश होता.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत