यशासाठी कठोर परिश्रमाची तयारी ठेवा- प्रा. दिनेश पवार

‘करिअर कट्टयात युवकांना मार्गदर्शन

लातूर, दि. 23 (जिमाका) : प्रत्येकजण स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडत असतो, शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्ये आत्मसात करत असतो. या प्रक्रियेत शिक्षण हा महत्वाचा टप्पा असून तो आयुष्याला कलाटणी देणाऱ्या या टप्प्यावर यशस्वी होण्यासाठी युवावर्गाने कठोर परिश्रमाची तयारी ठेवायला हवी, असे आवाहन ‘करिअर कट्टा’ या उपक्रमाचे मुख्य मार्गदर्शक प्रा. दिनेश पवार यांनी केले. लातूर येथे आयोजित विभागीय नमो महारोजगार मेळाव्यात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

युवक-युवतींसाठी रोजगार- स्वयंरोजगार आणि नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असतात, परंतु, या संधीचा लाभ घेण्यासाठी अभ्यास कसा करावा, याचे पुरेसे ज्ञान त्यांच्याकडे नसते. अशावेळी आपल्याला ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्याची सर्वंकष माहिती घेऊन पुढे जाणे, आपला कल ओळखून करिअची निवड करणे महत्वाचे ठरते. रोजगार स्वयंरोजगाराबरोबरच स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून नोकरीच्या अनेक संधी निर्माण होतात. त्यातून बेरोजगारी कमी होण्यास मदत होते. सरकारी नोकरीसाठी ही तयारी महत्वाची ठरते. त्यादृष्टीने स्पर्धा परिक्षांचे अभ्यासक्रम माहित करून घेऊन पुर्ण क्षमतेने त्या परीक्षांना सामोरे जाण्याची गरज असते, असे प्रा. पवार म्हणाले.

महाराष्ट्राला अनेक संतांची आणि महापुरुषांच्या विचाराचे अधिष्ठान आहे. युवावर्गाने आपली वाटचाल करतांना हे विचार दृष्टीपथात ठेवण्याची, आत्मसात करण्याची गरज आहे. प्रयत्नांच्या पराकाष्ठतेतूनच  आयुष्यातील संकल्प पूर्णत्वाला नेता येतो आणि तो प्रत्येकाने नेला पाहिजे असे मार्गदर्शनही त्यांनी यावेळी केले. मार्गदर्शन सत्राला विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी व युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवा वर्गाने सजग राहून रोजगार-स्वयंरोजगार माहिती घ्यावी-उत्तम गायकवाड

पूर्वी मोबाईल नव्हता, इंटरनेट सुविधा पण नव्हती. आज या सुविधा सहज उपलब्ध आहेत. मेळावे असतील किंवा अन्य माध्यमे यातून रोजगाराच्या तसेच नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. अशावेळी युवा वर्गाने सजग राहून रोजगार-स्वयंरोजगाराची तसेच नोकर भरतीची माहिती प्राप्त करून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालय अंगीकृत कंपनी एज्युकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड अर्थात एडशील कंपनीचे महाव्यवस्थापक उत्तम गायकवाड यांनी केले. लातूर येथे आयोजित छत्रपती संभाजीनगर विभागीय नमो महारोजगार मेळाव्यात ‘करिअर गाईडन्स’ विषयवार मार्गदर्शन करताना श्री. गायकवाड बोलत होते.

अनेक विभागामध्ये रिक्त पदे भरली जातात, त्याच्या जाहिराती येतात, याची  माहिती युवक- युवतींना नसते, विद्यार्थ्यांना नसते. अनेक पदांसाठी स्पर्धा परिक्षा घेतल्या जातात.  याची माहिती असणे अगत्याचे असते, त्यामुळे अशा संधींची उपलब्धता करून देणाऱ्या संकेतस्थळांना भेटी, माहिती घेणे, विविध माध्यमातून यासंबंधी येणाऱ्या बातम्यांचा मागोवा घेणे आवश्यक आहे, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी श्री.गायकवाड यांनी पीपीटी सादरीकरणातून परीक्षा घेणाऱ्या वेगवेगळ्या एजन्सींची माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध परीक्षा बोर्डाची देखील माहिती दिली तसेच रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधीविषयी देखील सांगितले.

*****

 




Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु