बदलत्या हवामानात बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर - पाशा पटेल

 

बदलत्या हवामानात बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

-         पाशा पटेल

·        तीन दिवसीय लातूर जिल्हा कृषि महोत्सवाचे उद्घाटन

·        10 फेब्रुवारीपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन

·        कृषि व गृहपयोगी वस्तूंच्या स्टॉलला नागरिकांचा प्रतिसाद


लातूर
, दि. 7 (जिमाका): बदलत्या हवामानामुळे शेतपिकांचे नुकसान होत असून त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत आहे. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळणे आवश्यक असून यासाठी राज्य शासनामार्फत सहाय्य केले जात असल्याचे महाराष्ट्र राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) येथे आयोजित लातूर जिल्हा कृषि महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवसांब लाडके, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी मन्सूर पटेल, जिल्हा कृषि विकास अधिकारी सुभाष चोले यावेळी उपस्थित होते. कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्यावतीने 8 ते 10 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत जिल्हास्तरीय कृषि महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.


वृक्षतोडीमुळे हवामानात बदल झाला असून शेतीला आणि मानवी जीवनालाही यापासून धोका निर्माण झाला आहे. बांबू पिक लागवडीतून पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी हातभार लावण्यासह चांगले उत्पन्न घेणे शक्य आहे. सध्या दगडी कोळशा वापरताना त्यामुळे पाच टक्के बांबूचा वापर करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे बांबूची मागणी वाढणार आहे. भविष्यात बांबूला चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे, असे आवाहन श्री. पटेल यांनी केले.

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

भारत हा कृषिप्रधान देश असून आपली नाळ शेतीशी जोडलेली आहे. हवामान बदलामुळे शेतीवर विविध संकटे येत आहेत. यावर मात करण्यासाठी, तसेच कमी खर्चात अधिक उत्पन्न करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा शेतीमध्ये वापर करणे आवश्यक आहे. यासोबतच कृषि उत्पादनांचे मार्केटिंग आणि ब्रँडिंग करण्यावर भर देण्याची गरज असून यासाठी शेतकऱ्यांना एकत्रित येवून शेतकरी उत्पादक कंपनी सुरु करता येईल, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. तसेच शेती हा प्रशासनाचा नेहमीच प्राधान्याचा विषय राहिला असून शेतकऱ्यांच्या पाठीशी जिल्हा प्रशासन सदैव उभे असल्याचे त्यांनी सांगितले.


शेतीमधील उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येवून प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमाल प्रक्रिया उद्योग करून अधिक दर मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले.

माती परीक्षण पुस्तिका आणि सोयाबीन लागवड तंत्रज्ञान पुस्तकाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने जिल्ह्यातील महिला बचतगटांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या 5 कोटी 14 लक्ष 40 हजार रुपयांचा यावेळी यावेळी महिला बचतगटांच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला. 

कृषि व गृहपयोगी वस्तूंचे 177 स्टॉल

जिल्हा कृषि महोत्सवात कृषि व गृहपयोगी वस्तूंचे 177 स्टॉल उभारण्यात आले आहेत. यामध्ये कृषि तंत्रज्ञान, अवजारे, औषधे, बियाणे यासह महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी उत्पादित केलेल्या वस्तू स्टॉल असून उद्घाटन समारंभानंतर उपस्थित नागरिकांनी या स्टॉलला भेट देवून खरेदी केली. महिला बचतगटांचे खाद्य पदार्थांचे स्टॉलही याठिकाणी उभारण्यात आले आहेत.

कृषि महोत्सवात शुक्रवारी होणार ऊस पिक लागवडीबाबत मार्गदर्शन

जिल्हा कृषि महोत्सवात शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता ऊस उत्पादन वाढीसाठीचे तंत्रज्ञान व विक्रमी ऊस उत्पादनाचा शेतकऱ्यांचा स्वानुभव विषयावर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील ब्रह्मदेव नवनाथ सरडे मार्गदर्शन करणार आहे. दुपारी 2 वाजता ऊस पिकातील सुधारित वाण व हंगामनिहाय पिक व्यवस्थापन याविषयावर सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथील मध्यवर्तीय ऊस संशोधन केंद्रातील सेवानिवृत्त ऊस पैदासकार डॉ. भारत रासकर यांचे मार्गदर्शन होईल. दुपारी 3.30 वाजता राजाराम सूर्यवंशी यांचे फर्टीगेशन, ठिबक सिंचन संच देखभाल व आम्लप्रक्रिया विषयावर मार्गदर्शन करतील. सायंकाळी 5 वाजता लोकगीते होतील.

*****






















 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु