भटक्या, विमुक्तांच्या पालावर पोहचले जिल्हा प्रशासन !

 भटक्या, विमुक्तांच्या पालावर पोहचले जिल्हा प्रशासन !

·       वंचितांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी पहिलाच उपक्रम

·        जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते विविध लाभांचे वितरण

·        शासकीय योजनांचा लाभ मिळाल्यामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

लातूर, दि. 28 (जिमाका) : विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील घटकांना त्यांचा पालावर जावून शासकीय योजनांचा लाभ देण्याचा अभिनव उपक्रम आज लातूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आला. प्रशासनाने आपल्या दारात येवून शासकीय योजनांचा लाभ दिल्याने महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायत क्षेत्रातील बुऱ्हानगर येथील पालावरील भटक्या विमुक्तांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले होते. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते जवळपास 90 व्यक्तींना विविध लाभांचे वितरण करण्यात आले.

जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, गट विकास अधिकारी तुकाराम भालके, भटके विमुक्त विकास परिषदेचे नरसिंह झरेराहुल चव्हाण यावेळी उपस्थित होते.

विविध कारणांमुळे विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार राज्यात पहिल्यांदाच भटक्या, विमुक्तांच्या पालावर जावून त्यांना शासकीय योजनांची माहिती आणि लाभ देण्यासाठी विशेष शिबीर लातूर जिल्हा प्रशासनाने आयोजित केले होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनात आणि प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. महसूल विभाग, पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, समाज कल्याण विभाग, बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी याठिकाणी उपस्थित राहून आपल्या विभागाशी संबंधित योजनांचे अर्ज भरून घेवून लाभाचे वितरण केले.

लातूर तालुक्यातील महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायत क्षेत्रात बुऱ्हानगर येथे वैदू आणि मसणजोगी समाजातील कुटुंबांची वस्ती आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित केलेल्या शिबिरात महसूल विभागामार्फत रेशनकार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व दाखला, जातीच्या प्रमाणपत्राच्या संचिका वितरीत करण्यात आल्या, तसेच राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा योजनेचे अर्ज भरून घेण्यात आले. तसेच आरोग्य विभागामार्फत याठिकाणी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुष्मान भारत कार्डचे वितरण करण्यात आले. शिक्षण विभागाने विमुक्त जाती व भटक्या जमाती घटकातील विद्यार्थ्यांना वह्यांचा संच वितरीत केल्या. बँकेमार्फत येथील नागरिकांचे बँक खाते काढणे, सामाजिक सुरक्षा योजनेचे अर्ज भरून घेण्यात आले. पुरवठा विभागामार्फत अंत्योदय योजनेतून साडीचे वितरण करण्यात आले.

प्रधानमंत्री आवास योजनेतून विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील नागरिकांना पक्के घर बांधून देण्यासाठी पंचायत समिती आणि समाज कल्याण विभागामार्फत प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतून घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देवून या नागरिकांना कायमस्वरूपी घर उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे गट विकास अधिकारी तुकाराम भालके यांनी सांगितले.

 

वंचितांपर्यंत शासकीय योजना पोचविण्यासाठी विशेष मोहीम : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

विमुक्त जाती व भटक्या जमाती घटकातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाने विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आज पहिल्याच शिबिराला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील नागरिकांना विविध शासकीय प्रमाणपत्रांसोबत विविध योजनांचा लाभही वितरीत करण्यात आला आहे. शासनाच्या योजनांचा लाभ देवून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील असून जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये अशी शिबिरे आयोजित करून भटक्या, विमुक्त घटकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा महिला, मुलींशी संवाद

विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील नागरिकांना विविध शासकीय योजनांच्या लाभाचे वाटप करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पालावरील कुटुंबियांशी संवाद साधला. विशेषतः महिला आणि मुलींची आपुलकीने विचारपूस करून त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. तसेच या समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागांना सूचना दिल्या. यावेळी शासकीय योजनांचा लाभ मिळाल्याबद्दल या महिलांना आनंद व्यक्त केला.

***** 











Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु