दुष्काळी परिस्थितीत जनावरांना चारा, हाताला काम आणि शेतकऱ्यांना मिळणार उत्पन्नाचे साधन ! • लातूर जिल्ह्यात 'व्हीबी-जी राम जी' योजनेतून चारा लागवडीचा पथदर्शी उपक्रम • शेतकऱ्यांना कोणताही खर्च नाही; बियाणे मोफत, मजुरी आणि इतर खर्चासाठीही तरतूद
दुष्काळी परिस्थितीत जनावरांना चारा,
हाताला काम आणि शेतकऱ्यांना मिळणार उत्पन्नाचे साधन !
• लातूर जिल्ह्यात 'व्हीबी-जी राम जी' योजनेतून चारा लागवडीचा पथदर्शी उपक्रम
• शेतकऱ्यांना कोणताही खर्च नाही; बियाणे मोफत, मजुरी आणि इतर खर्चासाठीही तरतूद
यंदा लातूर लातूर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ५१ टक्केच पाऊस झाल्याने आगामी काळात पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, लातूर जिल्ह्याने या संभाव्य संकटाला सामोरे जाण्याचा अत्यंत नियोजनबद्ध मार्ग निवडला आहे. जिल्ह्यातील ५ लाखांहून अधिक पशुधनाला ऐन टंचाईत पौष्टिक चारा मिळावा आणि दुष्काळाच्या सावटात ग्रामीण भागातील हातांना रोजगाराचा आधार मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने 'व्हीबी-जी राम जी' (विकसित भारत-रोजगार व आजीविका हमी मिशन) योजनेच्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण पथदर्शी उपक्रम हाती घेतला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या कल्पकतेतून साकारलेली ही मोहीम केवळ चाऱ्याची सोय करण्यापुरती मर्यादित नाही. जनावरांना चारा, हाताला काम आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबाला उत्पन्नाचा आधार या त्रिसूत्रीवर आधारित हा उपक्रम ग्रामीण भागासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. महसूल, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन आणि कृषी विभागाच्या सहकार्यातून या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
शेतकऱ्यांना बियाणे मोफत आणि मजुरीचीही सोय!
या उपक्रमाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार पडणार नाही. ज्या शेतकऱ्यांकडे रब्बी हंगामासाठी सिंचनाची सोय आहे, त्यांना जिल्हा वार्षिक योजनेतून ‘महाबीज’चे उच्च दर्जाचे 'स्पीडफीड' ज्वारी बियाणे मोफत दिले जात आहे. येत्या सात दिवसांत सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्रावर चारा लागवडीचे उद्दिष्ट गाठले जाणार असून, पुढील ५५ ते ६० दिवसांत हिरवागार चारा थेट गोठ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प प्रशासनाने सोडला आहे.
या योजनेअंतर्गत १ ते ५ एकरांपर्यंत वैयक्तिक जमिनीवर चारा लागवड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १ लाख २१ हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या माध्यमातून २४५ मनुष्यदिनांच्या रोजगाराच्या माध्यमातून नांगरणी, पेरणी, खत व्यवस्थापन, सिंचन आणि आंतरमशागतीपासून ते तीन टप्प्यांतील कापणीपर्यंतच्या कामांसाठी जवळपास ७७ हजार रुपयांची मजुरी थेट मिळून मजुरांच्या हाताला काम उपलब्ध होईल. तसेच बियाणे आणि इतर आवश्यक साहित्याच्या खर्चासाठी सुमारे ४४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
'स्पीडफीड' ज्वारीची एकदा पेरणी, तीन वेळा भरघोस कापणी
या उपक्रमासाठी निवडण्यात आलेले महाबीजचे 'स्पीडफीड' ज्वारी हे चाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. उत्तम नांगरणी केलेल्या जमिनीत प्रति एकर १२ ते १५ किलो बियाणे आणि ५ ते ७ मेट्रिक टन शेणखताचा वापर करून सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान याची पेरणी केली जाते. दोन ओळींत ३० सें.मी. आणि रोपांत १५ सें.मी. अंतर ठेवून केलेली ही पेरणी अवघ्या ५५ दिवसांत पहिली कापणी देते. विशेष म्हणजे, यानंतर पुढील ३५ ते ४० दिवसांच्या अंतराने आणखी दोन वेळा अशा एकूण तीन कापण्यांमधून मुबलक चारा मिळतो.
पशुधन नसले तरी उत्पन्न निश्चित !
या उपक्रमाची सर्वात महत्वाची बाब म्हणजे, यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःचे पशुधन असणे बंधनकारक नाही; फक्त नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या रब्बीच्या महिन्यात सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता असणे पुरेसे आहे. शेतकरी हा चारा स्वतःच्या जनावरांसाठी वापरू शकतात, अथवा गावात व जिल्ह्यात ज्यांना गरज आहे अशा इतर पशुपालकांना विकून उत्पन्नाचा मार्ग निर्माण करू शकतात. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी २३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. इच्छुकांसाठी लातूर जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर 'गुगल फॉर्म'ची लिंक देण्यात आली आहे.
***
Comments
Post a Comment