विशेष वृत्त पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घ्या खबरदारी ! · जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे आवाहन

 

विशेष वृत्त

पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य

आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घ्या खबरदारी !

·         जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे आवाहन

लातूर, दि.31 (जिमाका): सध्या पावसाळा सुरु झाला आहे. या काळात पिण्याचे पाणी दूषित होऊन कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ, अतिसार, हगवण, विषम ज्वर, पोलिओ यासारखे जलजन्य तसेच साठलेल्या पाण्यात डासांची पैदास होवून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या यासारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

अशी घ्या खबरदारी

पावसाळ्यात पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे, अथवा निर्जंतुकीकरणासाठी ‘मेडिक्लोर’चा वापर करावा. बाहेरील असुरक्षित पाणी पिण्यास वापरू नये, घराबाहेर पडताना घरातील निर्जंतुक केलेले पाणी सोबत घ्यावे. पिण्याचे पाणी साठविण्यासाठी तोटीच्या टाकीचा वापर करावा अथवा पिण्याच्या पाण्याचे भांडे लहान मुलांच्या हाताला येणार नाही, याप्रमाणे उंचावर ठेवावे. पाणी घेण्यासाठी वगराळ्याचा वापर करावा. पिण्याच्या पाण्यात हात बुडविल्यास हातावरील रोग जंतू पाण्यात मिसळून पाणी दूषित होऊ शकते. रोग जंतू प्रामुख्याने तळहातावर व नखाखाली असतात, त्यामुळे हात साबणाने स्वच्छ धुवावेत व नखे नियमीत काढावीत.

'सर्व ग्रामपंचायतींनी गावातील पिण्याचे पाणी निर्जंतुक करण्यासाठी आवश्यक असलेले ब्लिचिंग पावडर पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून त्याचा नियमितपणे पाणी निर्जंतुकीकरणासाठी वापर करावा. पावसाळ्यात माशांचा प्रादुर्भाव जास्त होत असल्याने घरातील अन्न पदार्थावर माशा बसू नयेत, यासाठी अन्नपदार्थ झाकून ठेवावेत. लहान मुले जेवण करताना अन्नपदार्थावर माशा बसू नयेत, यासाठी पालकांनी दक्षता घ्यावी. जास्त पिकलेली, सडलेली फळे खाऊ नयेत, उघड्यावर ठेवलेल्या भाज्या घरी गेल्यानंतर स्वच्छ धुवूनच त्याचा वापर करावा.

पावसाळ्यात बाहेरील पदार्थ खाणे टाळा

पावसाळ्यात बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. हॉटेलमधील उघड्यावर ठेवलेले व शिळे अन्न पदार्थ खाऊ नयेत. गाड्यावरील कापून ठेवलेली फळे खावू नयेत, त्यावर माशा आणि धूळ बसून ती रोगजंतूनी दूषित झालेली असू शकतात. तसेच फळांचा ज्यूस बनवितांना निर्जंतुक पाणी न वापरल्यास जलजन्य आजारांची लागण होऊ शकते. हॉटेल व्यावसायिकांनी व अन्नपदार्थ विकणाऱ्या दुकानदारांनी अन्नपदार्थ उघड्यावर न ठेवता ते काचेच्या कपाटात ठेवावेत अथवा जाळीदार झाकणाने झाकून ठेवावेत. अन्नपदार्थावर माशा बसणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तसेच पिण्यासाठी निर्जंतुक केलेले पाणी ग्राहकांसाठी उपलब्ध करावे. पाणी साठे उघडे ठेवू नये. हॉटेलमधील स्वयंपाकी व वेटर्स यांची वैयक्तिक स्वच्छता हाताची नखे कापलेली असणे, हात साबणाने स्वच्छ धुणे यासारख्या बाबींकडे हॉटेल मालकांनी लक्ष द्यावे.

वैयक्तिक, परिसर स्वच्छता महत्वाची

शौचास जाऊन आल्यानंतर व जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यावेत. शौचासाठी शौचालयाचा वापर करावा. उघड्यावर शौचास बसल्याने मलाद्वारे पिण्याचे पाणी दूषित होते. तसेच त्यावर माशा बसून अन्नपदार्थ दूषित होतात. हातपंप, विद्युतपंप, विहीर आदी पाणी उद्भवाच्या, स्त्रोताच्या 50 फुटाच्या परिसरात घाण पाणी साचलेले असल्यास अथवा उकिरडे असल्यास त्वरीत स्वच्छता करावी. पाणी पुरवठा जलवाहिनीवरील व्हॉलवर गळती असल्यास तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी. सार्वजनिक नळ योजनेचे पाणी घेण्यासाठी जमीनीत खड्डा करुन पाईप घेणे व त्याला तोटी न बसविल्यामुळे, खाद्यातील दूषित पाणी नळातून मुख्य जलवाहीनीत जाते व असे दूषित पाणी पिल्यामुळे जलजन्य आजार पसरतात. त्यामुळे नागरीकांनी याबाबत दक्षता घ्यावी. पाण्याच्या नळाला थेट विद्युत मोटार लावणे टाळावे त्यामुळे दूषित पाणी जलवाहिनीत ओढले जाते.

जलजन्य आजारावर त्वरित उपचार घ्यावेत

दूषित पाण्यामुळे लहान मुले अथवा वृध्दांना जुलाब, उलटीचा त्रास झाल्यास त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन तीव्र स्वरुपाची जलशुष्कता निर्माण होवून मृत्यू होऊ शकतो. अशावेळी त्यांना त्वरित जवळच्या शासकीय अथवा खासगी दवाखान्यात दाखल करून औषधोपचार करावा. तसेच प्रथमोपचार म्हणून मीठ साखर व पाणी या जलसंजीवनीचा किंवा ओआरएस पावडरचा आवश्यकतेनुसार वापर करावा.

कीटकजन्य आजारांचा फैलावर रोखण्यासाठी डासांची पैदास रोखा !

साचलेल्या शुध्द पाण्यात अथवा गढूळ पाण्यात डासांची पैदास होते. त्यामुळे साचलेल्या पाण्याचा त्वरीत निचरा करावा. वापरात नसलेल्या कुलरच्या टाक्या, जुने टायर्स, बकेट, नारळाच्या करवंट्या छतावरील अडगळ यामध्ये साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होते. त्यामुळे अशाप्रकारे पाणी साठू देवू नये. सर्व पाण्याच्या टाक्या आठवड्यातून एकदा स्वच्छ करून कोरडा दिवस पाळावा. डासांच्या अळ्या आढळून आल्यास अॅबेटिंग करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचित करावे. सांयकाळी विशेषतः 6 ते 8 दरम्यान डास घरात प्रवेश करतात. या काळात दारे खिडक्या बंद ठेवाव्यात. दारांना व खिडक्यांना स्टेनलेस स्टील/नॉयलॉन जाळ्या बसवून घ्याव्यात. झोपताना मच्छरदानीचा वापर करावा. सेप्टीक टँकच्या व्हेंट पाईपला नॉयलॉनची जाळी बसवावी.

सर्व खाजगी वैद्यकीय, व्यावसायीकांनी जलजन्य व किटकजन्य आजाराचे रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यास याबाबतची लेखी माहिती 24 तासाच्या आत जवळच्या शासकीय रुग्णालयास कळवावी. नागरिकांनी योग्य दक्षता घेवून दूषित पाण्यामुळे उद्भवणाऱ्या जलजन्य तसेच कीटकजन्य आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु