जनावरांच्या वाहतुकीत नियमांचे पालन बंधनकारक : जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड

जनावरांच्या वाहतुकीत नियमांचे पालन बंधनकारक : जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड लातूर, दि. १३ (जिमाका) : जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहनात केंद्रीय मोटार वाहन नियमांनुसार आवश्यक बदल करून वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडून विशेष परवाना घ्यावा. तसेच जनावरांच्या वाहतुकीसंदर्भातील कायदे व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिले. जिल्हास्तरीय प्राणी क्लेषप्रतिबंधक समितीची बैठक डॉ. बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जनावरांच्या वाहतुकीबाबत विविध निर्देश देण्यात आले. केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम १२५ (ई)(२) नुसार वाहनातून जनावरांची वाहतूक करताना प्रत्येक जनावरासाठी आवश्यक जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यानुसार गायी व म्हशींसाठी प्रत्येकी २ चौ. मीटर, घोडे व गाढवांसाठी २.२४ चौ. मीटर, बकऱ्या व बोकडांसाठी ०.३० चौ. मीटर आणि डुकरांसाठी ०.६० चौ. मीटर जागा असणे आवश्यक आहे. वाहनातून जनावरांची वाहतूक करताना वाहतूकदाराने सक्षम प्राधिकारी, भारतीय प्राणी कल्याण मंडळ, केंद्र शासनाने प्राधिकृत केलेले अधिकारी अथवा व्यक्ती किंवा प्राणी कल्याण संस्थेने दिलेले आवश्यक प्रमाणपत्र सोबत बाळगावे. प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० आणि प्राण्यांची वाहतूक नियम, २००१ मधील तरतुदींचे पालन केल्याशिवाय जनावरांची वाहतूक करू नये. नियमांचे पालन न केल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी दिली. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास