नशामुक्त भारत अभियान : व्यसनमुक्त भविष्यासाठी सामूहिक संकल्प

नशामुक्त भारत अभियान : व्यसनमुक्त भविष्यासाठी सामूहिक संकल्प 'नशामुक्त भारत अभियाना'ला अधिक गती देण्यासाठी आणि समाजात सामूहिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी 18 ऑगस्ट 2026 रोजी संपूर्ण देशात 'National Pledge Against Drug Abuse' (अमली पदार्थ विरोधी राष्ट्रीय शपथ) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, त्या अनुषंगाने या कार्यक्रमाची पार्श्वभूमी विषद करणारा हा विशेष लेख. 'नशामुक्त भारत अभियान' (NMBA) ही केवळ एक योजना किंवा मोहीम नाही, तर ती आपल्या देशाच्या सुरक्षित आणि उज्वल भविष्याची पायाभरणी आहे. अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यातून आपल्या युवा पिढीला बाहेर काढणे आणि देशाला सक्षम बनवणे, हा या अभियानाचा मुख्य धोरणात्मक हेतू. केंद्र आणि राज्य सरकारे या मोहिमेद्वारे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे प्रयत्न करत आहेत. जेव्हा आपला समाज आणि विशेषतः तरुण पिढी व्यसनमुक्त असते, तेव्हाच देशाची खरी प्रगती शक्य होते. म्हणूनच, हे अभियान राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे आहे.गेल्या पाच-सहा वर्षांतील या अभियानाचा व्यापक विस्तार पाहता, आता आपण एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 15 ऑगस्ट 2020 रोजी सुरू झालेले हे अभियान आता सहाव्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण करत आहे. या मोहिमेने अल्पावधीतच अभूतपूर्व यश संपादन केलेले आहे. आतापर्यंत 20 कोटींहून अधिक नागरिक या अभियानाशी सक्रियपणे जोडले गेले आहेत. 11 कोटींहून अधिक तरुणांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे, जे देशाच्या बदलत्या मानसिकतेचे प्रतीक आहे. सात कोटींहून अधिक महिला या मोहिमेत आघाडीवर आहेत. याचाच अर्थ, सात कोटी घरे आता व्यसनाच्या संकटापासून सुरक्षित राहण्यासाठी सज्ज झाली आहेत. 9.22 लाखांहून अधिक जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. 1.19 लाख नोंदणीकृत 'नशामुक्त मित्र' तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मार्गदर्शन करत आहेत. हे यश केवळ आकडेवारीपुरते मर्यादित नाही, तर ती एक शक्तिशाली 'लोकचळवळ' बनली आहे. याच प्रवासाला पुढे नेण्यासाठी 18 ऑगस्ट 2026 रोजी एका विशेष राष्ट्रीय शपथ कार्यक्रमांचे आयोजन जिल्ह्यात आयोजन करण्यात आले आहे. 'नशामुक्त भारत अभियाना'ला अधिक गती देण्यासाठी आणि समाजात सामूहिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी 18 ऑगस्ट 2026 रोजी संपूर्ण देशात 'National Pledge Against Drug Abuse' (अमली पदार्थ विरोधी राष्ट्रीय शपथ) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, खाजगी संस्था आणि शासकीय कार्यालयांमध्ये एकाच वेळी ही शपथ घेतली जाणार आहे. जिल्हा स्तरावर 'जिल्हा समाज कल्याण अधिकारी' आणि 'सहाय्यक आयुक्त' यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ते या कार्यक्रमाचे संचलन करतील. ही शपथ केवळ वैयक्तिक नसून, आपले कुटुंब, मित्र आणि संपूर्ण समुदायाला अमली पदार्थांच्या धोक्यापासून सुरक्षित ठेवण्याचा तो एक दृढ निश्चय आहे. प्रत्येक राज्याने आणि केंद्रशासित प्रदेशाने आपल्या एकूण लोकसंख्येच्या किमान 10 टक्के नागरिकांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, जेणेकरून 'सामूहिक प्रतिकारशक्ती' (Community Immunity) निर्माण होईल. या मोहिमेत तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आधुनिक डिजिटल साधनांचा प्रभावी वापर केला जात आहे. नशा मुक्त भारत अभियानाच्या (NMBA) सहाव्या वर्धापनदिनानिमित्त 18 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविद्यालये व शासकीय, अनुदानित वसतिगृहांमधील विद्यार्थी यांनी राष्ट्रीय व्यसनमुक्तीची शपथ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केलेले आहे. राष्ट्र उभारणीच्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुखांनी कार्यालयाच्या परिसरातील Smart City LED Display Screens, सोशल मीडिया, पोस्टर्स आणि बॅनर्सद्वारे व्यसनमुक्ती मोहिमेचा प्रचार, प्रसार करावा. कर्मचारी व नागरिकांनी नशा मुक्ती मित्र नोंदणी https://nashamukt.dosje.gov.in/nasha-mukti-mitr या लिंकवरून करावी. केंद्र सरकारच्या https://nashamukt.dosje.gov.in/epledge या अधिकृत संकेतस्थळावरून 'e-Pledge' घेऊन अभियानात सक्रीय सहभागी होत प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. व्यसनमुक्तीसाठी असलेल्या हेल्पलाईन क्रमांक 14446 चा देखील प्रचार-प्रसार करावा, असेही जिल्हाधिकारी यांनी आवाहन केलेले आहे. 'नशामुक्त भारत' हे ध्येय गाठणे ही केवळ सरकारचीच जबाबदारी आहे, असे नाही. तर ते आपल्या सर्वांचे सामूहिक कर्तव्य आहे. 18 ऑगस्टचा शपथविधी हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नाही, ती स्वतःला आणि समाजाला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्याची एक प्रतिज्ञा आहे. आपण सर्वजण या महायज्ञात सहभागी होऊया. ई-शपथ घेऊन आपले प्रमाणपत्र मिळवूया आणि इतरांनाही प्रेरित करूया. आपला हा एक छोटासा संकल्प देशासाठी एक मोठे आणि सकारात्मक परिवर्तन घडवून आणेल. व्यसनमुक्त भारत, समर्थ भारत! - डॉ. श्याम टरके , माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, लातूर

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास