एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान भाजीपाला, फळपिकाच्या प्लॅस्टिक मल्चिंगसाठी मिळणार अनुदान प्रतिहेक्टर 16 हजार रुपयां पर्यंत अनुदान देय महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
भाजीपाला, फळपिकाच्या प्लॅस्टिक मल्चिंगसाठी मिळणार अनुदान
· प्रतिहेक्टर 16 हजार रुपयांपर्यंत अनुदान देय
· महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
*लातूर,दि.29(जिमाका):* भाजीपाला व फळ पिकाला प्लॅस्टिक मल्चिंग करण्यासाठी शेतकऱ्यांना एकात्मिक
फलोत्पादन विकास अभियानांतर्गत प्रतिहेक्टरी खर्चाच्या पन्नास टक्के म्हणजेच 16
हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी
पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
प्लॅस्टिक मल्चिंगसाठी प्रति हेक्टरी 32 हजार खर्च अपेक्षित असून, या
खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच 16 हजार रुपये प्रतिहेक्टर इतके अनुदान देण्यात येते. महाडीबीटी
पोर्टलवर भाजीपाला व फळपिकांसाठी प्लॅस्टिक मल्चिंग या बाबीसाठी आतापर्यंत 442
अर्ज प्राप्त झालेले होते. त्यापैकी 320 अर्जांची लॉटरीद्वारे निवड झाली आहे. निवड
झालेल्या लाभार्थ्यापैकी 182 लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष कामे केलेली नाहीत वा
करण्याची इच्छा दर्शविली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांचे अर्ज रद्द झाले आहेत.
उर्वरीत 170 अर्जापैकी 32 लाभधारकांना त्यांनी कामे पुर्ण केल्यामुळे पाच लक्ष 22
हजार रुपये अनुदान अदा करण्यात आलेले आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यापैकी 138
लाभार्थ्यांचे अर्ज प्रक्रियेमध्ये असून त्यांची कामे पुर्ण केल्यानंतर अनुदान अदा
करण्यात येणार आहे.
अर्ज केलेल्या एकूण 442 लाभार्थ्यांपैकी 122 लाभार्थ्यांची लॉटरीमध्ये
अद्याप निवड झालेली नसून नजिकच्या काळामध्ये सदर लाभार्थ्यांची निवड अपेक्षित आहे.
जिल्ह्याला प्लॅस्टिक मल्चिंगसाठी मिळालेला लक्षांक पाहता अर्ज केलेल्या प्रत्येक
लाभार्थ्यास योजनेचा लाभ देणे शक्य आहे. अधिक माहितीसाठी लातूर जिल्हा अधीक्षक
कृषि अधिकारी कार्यालयातील फलोत्पादन तंत्र सहाय्यक विकास बालकुंदे (भ्रमणध्वनी- 9823238338)
यांच्याशी किंवा संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. या
योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा
अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने केले आहे.
अशी ठरवा प्लॅस्टिक मल्चिंग पेपरची जाडी
तीन ते चार महिन्याच्या (भाजीपाला) पिकासाठी प्लॅस्टिक मल्चिंग पेपरची जाडी
किमान 25 मायक्रॉन असावी. तसेच बारा महिन्याच्या (उदा. पपई) या फळपिकासाठी मल्चिंग
पेपरची जाडी किमान 50 मायक्रॉन असावी. तसेच बारा महिन्याच्या वरील (जास्त
कालावधीचे फळ पिके) फळपिकासाठी मल्चिंग पेपरची जाडी किमान 100 किंवा 200 मायक्रॉनपेक्षा
कमी असू नये.
****
Comments
Post a Comment