वस्तू आणि सेवा बाजाराचा गुणात्मक दर्जा राखला जावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा ; नागरिकांनी कायदा अवगत करून घ्यावा - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी

 









वस्तू आणि सेवा बाजाराचा गुणात्मक दर्जा राखला जावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा ; नागरिकांनी कायदा अवगत करून घ्यावा

       - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

️ ग्राहक संरक्षण कायदा उल्लंघनाचे जिल्ह्यात 700 प्रकरण

️ भारतीय मानक ब्युरोच्या वैज्ञानिकांनी केले ग्राहक संरक्षण कायद्याचे सादरीकरण

️ ग्राहक संरक्षण कायद्याच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठीच्या पुस्तिकेचे प्रकाशन

 

            लातूर दि.30 ( जिमाका ) सेवा आणि गृह उपयोगी बाजार मोठ्या प्रमाणात वाढतांना त्याचा गुणात्मक दर्जा, ग्राहक हित या गोष्टीचा विचार करूनच 2019 चा ग्राहक संरक्षण कायदा झाला आहे. हा कायदा सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या त्या त्या विभागांनी अधिक सक्रियपणे काम करावे. आज जिल्ह्यात ग्राहक कायद्याचे उल्लंघन केल्याच्या सातसे केसेस झालेल्या आहेत. उत्पादक,विक्रेते आणि ग्राहक यांनी या कायद्याचे अवलोकन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले.

                   राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग जिल्हा अध्यक्ष श्रीमती रेखा जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सदस्य रवींद्र राठोडकर, जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे, लातूरचे तहसीलदार स्वप्नील पवार, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सावंत उपस्थित होते.

                  विक्रेत्याने एखादी वस्तू खराब दिली आणि ग्राहक म्हणून आपली फसवणूक झाली असेल तर 2019 च्या ग्राहक संरक्षण कायद्यातील तरदुतीनुसार तुम्हाला न्याय मिळतो. त्यामुळे हा कायदा जाणून घ्या तसेच जिल्ह्यातील विविध प्रशासकीय विभागांनीही जनतेमध्ये या कायद्याची जागृती करावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. जिल्हा प्रशासनाकडून ग्राहक संरक्षण यावर जी पुस्तिका प्रकाशित करण्यात आली त्यात या कायद्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

                   बाजार यंत्रणेचा राजा ग्राहक असून त्याने खरेदी केलेली वस्तू आणि सेवा ही गुणवत्तापूर्ण मिळायला हवी. या ग्राहकाच्या अधिकाराचे संरक्षण करणारा कायदा म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा 2019 असून  पूर्वी विकलेली वस्तू खराब निघाली तर विक्रेते हात वर करत होते, आता त्याला या कायद्याने खराब निघालेली वस्तू परत घ्यावी लागते. अन्यथा कायद्याप्रमाणे कारवाईला सामोरे जावे लागते अशी माहिती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सदस्य रवींद्र राठोडकर यांनी यावेळी दिली.

                   यावेळी अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी केले. यावेळी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सावंत यांनी लिहलेल्या ग्राहक संरक्षण कायदा माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी जिल्हा ग्राहक पंचायतचे पदाधिकारी दत्तात्रय मिरकले, डॉ. प्रल्हाद तिवारी, राजेंद्र भोसले उपस्थित होते.

कार्यक्रम संपल्यानंतर ग्राहक दिना निमित्त आयोजित विविध विभागांच्या स्टॉलला जिल्हाधिकारी यांनी भेटी देऊन ग्राहक जागृती बद्दल अधिक उत्तम करण्याच्या सूचना दिल्या.

वस्तूचे मानांकन पाहायचे आहे?

                  नागरिकांना गुणवत्तापूर्ण वस्तू आणि सेवा मिळाव्यात म्हणून देशात "भारतीय मानांकन ब्युरो" नियंत्रक म्हणून कार्य करते.. आय. एस. आय, हॉलमार्क अशा प्रकारचे मानांकन या ब्युरो कडून प्रमाणित केले जातात. देशभरात या ब्युरोच्या 41 शाखा असून जवळपास 300 प्रयोगशाळा आहेत. महाराष्ट्राचे काम पुणे शाखेतून चालते. कोणत्याही वस्तू बद्दलचे मानांकन जाणून घ्यायचे असेल तर प्ले स्टोर वरून biscare हे अ‍ॅप डाउनलोड करून घ्यावे. त्यातून तुम्हाला वस्तूचे मानांकन आणि तक्रारही करता येते अशी माहिती भारतीय मानांकन  ब्युरो, पुणे च्या वैज्ञानिक " सी" श्रीमती कृतिदास यांनी आपल्या सादरीकरणातून दिले. यावेळी ग्राहकांसाठी  hpnbo@bis.gov.in आणि pnbo@bis.gov.in हे दोन ईमेलही त्यांनी सांगितले.

 

                                                           

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा