बाभळगाव येथे आरोग्य विभागाची तपासणी मोहीम
बाभळगाव येथे आरोग्य विभागाची तपासणी मोहीम
·
236 घरांचे सर्वेक्षण; 14 तापरुग्णांचे रक्तनमुने घेतले
लातूर दि.2 (जिमाका) : जिल्ह्यातील बाभळगाव येथे चिकुनगुनिया आजाराचा प्रादुर्भाव झाल्याबाबत माहिती प्राप्त होताच आरोग्य विभागाने 30 नोव्हेंबर रोजी तातडीने उपायोजना करून 236 घरांमध्ये ताप सर्वेक्षण मोहीम राबविली. यामध्ये तापाचे 14 रुग्ण आढळून आले असून त्यांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
चिकुनगुनिया
प्रादुर्भावाविषयी माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही.वडगावे यांनी
जिल्हा सर्वेक्षण पथकाला त्वरित बाभळगाव येथे जावून तपासणी करण्याच्या सूचना
दिल्या. त्यानुसार जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, जिल्हा साथरोग तज्ञ डॉ. आशुकेत वैरागे यांच्यासह जिल्हा हिवताप
कार्यालयाचे जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक श्री. यु. के. कांबळे व पथक बाभळगावातील
वैशाली नगर येथे दाखल झाले.
आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत येथील 236 घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ताप सर्वेक्षण आणि किटकशास्त्रीय सर्वेक्षणाचा समावेश होता. या सर्वेक्षणात तापाचे 14 रुग्ण आढळून आले आहेत. यामधील नऊ रुग्णांचे रक्तजल नमुने डेंग्यू आणि चिकुनगुनियाविषयक तपासणीसाठी विशेष दूतामार्फत नांदेड येथील सेंटीनल सेंटर हॉस्पिटलला पाठविण्यात आले आहेत. उर्वरीत पाच रुग्णांचे रक्त नमुने हिवताप निदानासाठी पाठविण्यात आले होते. त्याची तपासणी जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली असून सर्व पाचही रुग्णांचे हिवताप तपासणी अहवाल नकारात्मक आले आहेत.
यावेळी 48 घरांमध्ये डास अळी सर्वेक्षण करण्यात आले.
यामध्ये अकरा घरांमध्ये डास अळ्या आढळून आल्या असून याठिकाणी टेलिफॉस औषधी असलेले
ऑबेट सोल्युशन टाकून डास अळ्यांचा नाश करण्यात आला. प्रतिबंधात्म उपाययोजना म्हणुन
सर्व 236 घरातील पाणी साठ्यामध्ये ऑबेट टाकण्यात आले. तसेच आठवड्यातून एक दिवस
कोरडा दिवस पाळणे, पाणी साठे झाकून ठेवणे, मच्छरदाणीचा वापर करणे, डास प्रतिबंधात्मक क्रिम व
कॉईलचा वापर करणे, नाल्या वाहत्या करण्याबाबत यावेळी
जनजागृती करण्यात आली. डासांची घनता कमी करण्यासाठी ग्रामपंचायतीने या भागात धूर
फवारणी केली. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत नियमित ताप सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच .व्ही. वडगावे यांनी कळविले आहे.
*****
Comments
Post a Comment