मतदार नोंदणीसाठी दोन दिवस विशेष शिबिराचे आयोजन

 

मतदार नोंदणीसाठी दोन दिवस विशेष शिबिराचे आयोजन

लातूर, दि. 2 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार 9 नोव्हेंबर ते दिनांक 8 डिसेंबर  या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येत असून 1 जानेवारी 2023 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नागरिकांना यामध्ये नाव नोंदणी करता येणार आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात शनिवार, 3 डिसेंबर आणि रविवार, 4 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना मतदान केंद्रांवर उपस्थित राहून नागरिकांचे अर्ज स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता (बीएलए) यांना या मोहिमेस उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे. छायाचित्र मतदार ओळखपत्र हे मतदारांची ओळख पटविण्यासाठी असून मतदारांचे नाव मतदार यादीत

असेल तरच मतदान करता येते. त्यामुळे मतदान ओळखपत्र असले तरीही मतदार यादीत नाव असल्याची खात्री करावी. जेणेकरून मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क गमावण्याची वेळ येणार नाही, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

सन 2023 च्या जानेवारी, एप्रिल, जुलै, ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेला किंवा त्यापूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण होणार असतील, तर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नमुना अर्ज क्र. सहा भरून आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अथवा आपण अद्याप मतदार म्हणून नोंदणी न केलेल्या नागरिकांनी छायाचित्र मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. मतदार म्हणून नोंदणी करणे, नोंदीमध्ये दुरुस्ती करणे व आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी Voter Helpline App या मोबाईल अॅपद्वारे किंवा https://www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

1 जानेवारी 2023 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांनी, तसेच सन 2023 च्या जानेवारी, एप्रिल, जुलै, ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेला किंवा त्याच्या आधी 18 वर्षांचे होणाऱ्या युवा मतदारांनी व अद्याप मतदार म्हणून नोंदणी न केलेल्या सर्व पात्र नागरीकांनी छायाचित्र मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसंदर्भात विशेष मोहिमेत विहित नमुन्यातील अर्ज भरून आणि सोबत आवश्यक कागदपत्रे सादर करून आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु