एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सामूहिक शेततळे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
एकात्मिक फलोत्पादन विकास
अभियान
सामूहिक शेततळे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि. 29 (जिमाका) : भाजीपाला,
फळे
व फुले इत्यादी पिकांसाठी पाण्याचा स्त्रोत निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना एकात्मिक
फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सामूहिक शेततळे योजनेचा लाभ देण्यात येतो. यामध्ये
दोन आकारातील शेततळ्यांचा समावेश असून लाभार्थी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान
दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा,
असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
शेतकऱ्यांकडे दोन ते
पाच हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्र फळपिके, भाजीपाला, फुलपिके, औषधी-सुगंधी
आदी पिकांखाली असल्यास 34 मीटर x 34 मीटर x 4.7
मीटर आकाराच्या सामूहिक शेततळ्याचा लाभ देण्यात येतो. या शेततळ्यासाठी 3 लाख 39
हजार रुपयेपर्यंत अनुदान दिले जाते. तसेच शेतकऱ्याकडे एक ते दोन हेक्टर किंवा
त्यापेक्षा अधिक क्षेत्र फळपिके, भाजीपाला, फुलपिके, औषधी-सुगंधी आदी पिकांखाली
असल्यास 24 मीटर x 24 मीटर x 4
मीटर आकारमानाचे सामूहिक शेततळे दिले जाते. यासाठी एक लक्ष 75 हजार रुपये अनुदान
दिले जाते.
सामूहिक शेततळ्यासाठी
देय अनुदानामध्ये खोदकाम, प्लॅस्टिक अच्छादन करणे तसेच संरक्षणासाठी
तारेचे कुंपन करणे इत्यादी बाबींचा समावेश आहे. अस्तरीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या
प्लॅस्टिक फिल्मची जाडी 500 मायक्रॉनपेक्षा जास्त असावी. योजनेच्या अधिक
माहितीसाठी लातूर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील तंत्र
सहाय्यक-फलोत्पादन विकास बालकुंदे (भ्रमणध्वनी क्र. 9823238338) किंवा संबंधित
तालूका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि
अधिकारी यांनी केले आहे.
लातूर जिल्ह्यात आतापर्यंत
महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन पिकांसाठी सामूहिक शेततळे या बाबीसाठी 129 अर्ज
प्राप्त झाले होते. त्यापैकी 71 अर्जांची लॉटरीमध्ये निवड झाली असून निवड झालेल्या
लाभार्थ्यांपैकी 46 लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष कामे केलेली नाहीत वा करण्याची इच्छा
दर्शविली नाही. त्यामूळे या लाभार्थ्यांचे अर्ज रद्द झाले असून उर्वरीत 25 अर्जांपैकी
एका लाभधारकास रक्कम 3 लाख 34 हजार रुपये आते अनुदान अदा करण्यात आले आहे. निवड
झालेल्या लाभार्थ्यापैकी 24 लाभार्थ्यांचे अर्ज प्रक्रियेमध्ये असून त्यांच्या
शेततळयाचे कामे पूर्ण झाल्यानंतर त्यांना अनुदान अदा करण्यात येणार आहे.
अर्ज केलेल्या एकूण 129
लाभार्थ्यांपैकी अद्याप 58 लाभार्थ्यांची लॉटरीमध्ये निवड झालेली नसून नजिकच्या
काळामध्ये या लाभार्थ्यांची निवड अपेक्षित आहे. जिल्ह्याचा सामूहिक शेततळे या
बाबीचा लक्षांक पाहता अर्ज केलेल्या प्रत्येक लाभार्थ्यास योजनेचा लाभ देणे शक्य
आहे. त्यामुळे या योजनेसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
करण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment