सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास प्रारंभ सैनिक कल्याण निधीसाठी गतवर्षीप्रमाणे यंदाही उद्दिष्टापेक्षा अधिक संकलन करणार -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

 

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास प्रारंभ

सैनिक कल्याण निधीसाठी गतवर्षीप्रमाणे

यंदाही उद्दिष्टापेक्षा अधिक संकलन करणार

-         जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

·        सैनिकांच्या पाल्यांच्या ‘नीट क्लासेस’ प्रवेशासाठी प्रयत्न करणार

·        माजी सैनिकांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे नियोजन

लातूर, दि. 12 (जिमाका) : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनासाठी गतवर्षी प्राप्त झालेल्या 42 लाख 22 हजार रुपयांपेक्षा अधिक ध्वजदिन निधीचे संकलन करण्यात आले. जिल्ह्यात यावर्षीही उद्दिष्टापेक्षा अधिक निधी संकलन केले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आज येथे दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2022 संकलनास सुरुवात झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक अधिकारी विजयकुमार ढगे, मेजर (नि.) व्ही. व्ही. पटवारी, कर्नल (नि.) बी. आर. हारणे व शरद पांढरे यांच्यासह माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, वीरपिता यावेळी उपस्थित होते.

देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी अतिशय प्रतिकूल वातावरणातही सैनिक आपले कर्तव्य बजावितात. त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काम करावे. सैनिक, माजी सैनिक यांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याची कार्यवाही सर्व शासकीय विभागांमार्फत करण्यात येत असून माजी सैनिकांना काही अडचणी असल्यास त्यांनी जिल्हा सैनिक कार्यालयाशी संपर्क साधावा. माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समन्वय केला जाईल, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यावेळी म्हणाले.

माजी सैनिकांसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. दुर्धर आजारांचे निदान आणि उपचारासाठी शहरातील नामांकित डॉक्टरांच्या सहाय्याने माजी सैनिकांसाठी लवकरच विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले. तसेच सैनिकांच्या वैद्यकीय शिक्षण घेण्यास इच्छुक दहावी, बारावी उत्तीर्ण पाल्यांना ‘नीट’च्या शहरातील नामांकित शिकवणी वर्गांमध्ये सवलतीच्या दरात प्रवेश मिळवून देण्यासाठी शिकवणी वर्ग संचालकांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गतवर्षी जिल्ह्यासाठी 42 लाख 22 हजार रुपयांचे उद्दिष्ट असताना सुमारे 43 लाख 18 हजार रुपये म्हणजेच 102 टक्के ध्वजदिन निधी संकलित करण्यात आला होता. यावर्षीही 42 लाख 22 हजार रुपयांचे उद्दिष्ट असून गतवर्षीप्रमाणेच यंदाही उद्दिष्टापेक्षा अधिक निधी संकलित होईल, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. म्हणाले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मुंडे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. वीरपत्नी, वीरमाता व वीरपिता तसेच शौर्यपदक प्राप्त सैनिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. दहावी, बारावी परीक्षेत यश मिळविलेल्या सैनिकांच्या पाल्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. ढगे यांनी केले. सूत्रसंचालन सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सावंत यांनी केले, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील वरिष्ठ लिपिक संजीव पवार यांनी आभार मानले.





Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु