विविध उपक्रमांनी जिल्ह्यात साजरा होणार ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’

 

विविध उपक्रमांनी जिल्ह्यात साजरा होणार

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’

·         विविध विभागांवर जबाबदारी

·         जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आढावा

लातूर, दि. 07 (जिमाका) : राज्याची राजभाषा मराठीचा वापर जास्तीत जास्त व्हावा, मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, यासाठी 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2023 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जाणार आहे. यानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून याविषयीची आढावा बैठक सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, मराठवाडा साहित्य परिषदेच्या लातूर शाखेचे अध्यक्ष जयद्रथ जाधव यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध, प्रश्नमंजुषा, कथाकथन, कविता लेखन, शुद्धलेखन यासारख्या स्पर्धांचे शिक्षण विभागाने आयोजन करावे. तसेच मराठी वाचन संस्कृती वाढावी, यासाठी मराठी भाषेतील अभिजात ग्रंथांचा परिचय करून देण्यासाठी नांदेड विद्यापीठाच्या उपकेंद्राने परिसंवाद, कार्यशाळेचे आयोजन करावे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथदिंडी, कथाकथन, काव्यवाचन आदी साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. तसेच जिल्ह्यात पुस्तकाची जत्रा उपक्रम आयोजित करून या जत्रेत लोकांनी आपली पुस्तके निःशुल्क किंवा स्वस्त दरामध्ये इतरांना देण्यासारखे कार्यक्रम राबवावेत, अशा सूचना उपजिल्हाधिकारी श्री. महाडिक यांनी यावेळी दिल्या.

मराठी भाषेच्या वापराबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी यांनी आकाशवाणी, दूरदर्शन, खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्या, एफ. एम. रेडीओ, स्थानिक केबल नेटवर्क, फेसबुक, ट्विटर यासह समाजमाध्यमांतून संदेश प्रसारित करावेत. मराठवाडा साहित्य परिषदेनेही मराठी वाचन संस्कृती जपण्यासाठी पंधरवडा कालावधीत विविध उपक्रम राबवावेत. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आयोजनासाठी सर्व शासकीय विभागानाचा सक्रीय सहभाग आवश्यक असून जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शासकीय कार्यालयांमध्ये विविध उपक्रम हाती घ्यावेत, असे श्री. महाडिक यावेळी म्हणाले.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु