विज्ञान शाखेच्या बारावीतील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटपासाठी आज तालुकानिहाय शिबीर

 

विज्ञान शाखेच्या बारावीतील विद्यार्थ्यांना

जात प्रमाणपत्र वाटपासाठी आज तालुकानिहाय शिबीर

·      जिल्ह्यात पाच ठिकाणी होणार आयोजन

·      सकाळी साडेदहापासून प्रमाणपत्र वाटपास सुरुवात

·      मंडणगड पॅटर्नप्रमाणे जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत होणार मार्गदर्शन

लातूर, दि. 02 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 26 नोव्हेंबर, संविधान दिवस ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन अर्थात 6 डिसेंबरपर्यंत ‘समता पर्व’ अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विज्ञान शाखेत इयत्ता बारावीमध्ये प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी शिबिराचे 3 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. दहा तालुक्यांमधील प्रमाणपत्र वाटपासाठी जिल्ह्यातील पाच ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी सकाळी साडेदहापासून प्रमाणपत्र वाटपास सुरुवात होईल, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत कळविण्यात आले आहे.

 सन 2022-23 या वर्षातील विज्ञान शाखेच्या इयत्ता बारावीमध्ये प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दाखल केलेल्या जाती दावा पडताळणी प्रस्तावामध्ये समितीने 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत वैध केलेल्या प्रकरणातील अर्जदारांना या शिबिरात समक्ष जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. तसेच यावेळी सर्व महाविद्यालयामध्ये स्थापन केलेल्या समान संधी केंद्रासाठी नियुक्त केलेले प्रमुख प्रतिनिधींना मंडणगड पॅटर्नप्रमाणे जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

‍लातूर व रेणापूर तालुक्यातील विज्ञान शाखेत इयत्ता बारावीमध्ये प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थांना  लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र वाटप होईल. तसेच औसा व निलंगा या तालुक्यातील विद्यार्थ्यांना औसा येथील अझीम सायन्स महाविद्यालयात, उदगीर व देवणी या तालुक्यातील विद्यार्थ्यांना उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील शिबिरात, चाकूर व शिरुर अनंतपाळ या तालुक्यातील विद्यार्थ्यांना चापोली येथील संजीवनी महाविद्यालयातील शिबिरात आणि अहमदपूर व जळकोट तालुक्यातील विद्यार्थ्यांना अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयातील शिबिरात सकाळी साडेदहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र वितरीत करण्यात येईल.

जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सन 2022-23 या वर्षांतील विज्ञान शाखेत प्रवेशित इयत्ता अकरावी व बारावीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत तालुकानिहाय शिबिराविषयी कळवावे. तसेच महाविद्यालयामध्ये स्थापन केलेल्या समान संधी केंद्राचे नियुक्त प्रमुख प्रतिनिधी यांना मंडणगड पॅटर्नप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी माहितीसह उपस्थित राहणेबाबत कळविण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष सुनिल महिंद्रकर, उपायुक्त तथा सदस्य अनिल शेंदारकर, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव शिवकांत ना. चिकुर्ते यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु