आपत्ती व्यवस्थापनाच्या रंगीत तालमीत शोध व बचाव मोहिमेचे प्रात्यक्षिक भूकंपाने दुमजली इमारत कोसळते तेव्हा..!

 

आपत्ती व्यवस्थापनाच्या रंगीत तालमीत शोध व बचाव मोहिमेचे प्रात्यक्षिक

भूकंपाने दुमजली इमारत कोसळते तेव्हा..!

 पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल

 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाने वाचविला चार जणांचा जीव

·       भूकंपग्रस्त इमरात परिसरातील जखमींना त्वरित मिळाली मदत

लातूर, दि. 28 (जिमाका) : वेळ सकाळी साडेअकराची... जिल्हा क्रीडा संकुलाचा परिसर... प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त. अचानक मोठा आवाज झाला, काही समजण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात धूळ उडाली. भूकंपाच्या तीव्र धक्क्याने येथील दुमजली इमारत कोसळल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला...याच दरम्यान एका व्यक्तीने फोन करून पोलीस नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली...आणि सुरु झाली भूकंपग्रस्त इमारतीतील जखमींची शोध व बचाव मोहीम. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या आयोजित भूकंप विषयक आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीमचा हा प्रसंग.

भूकंपामुळे दुमजली इमारत कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस नियंत्रण कक्षातून पोलीस पथकाला सूचना गेल्या. तसेच लातूर महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग, आरोग्य विभागालाही पोलीस नियंत्रण कक्षातून या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस पथक, अग्निशमन वाहन, होमगार्ड आणि रुग्णवाहिकासह वैद्यकीय पथक काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. घटना प्रतिसाद प्रणाली अर्थात आयआरएसनुसार इन्सीडंट कमांडर, ऑपरेशनल चिफ, लायझनिंग ऑफिसर, इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर इन्चार्ज, जनसंपर्क अधिकारी यांनी त्वरित आपल्या कामाला सुरुवात केली. घटनास्थळीच वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले, तेसच इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर कार्यान्वित करण्यात आले.

पोलिसांनी त्वरित परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. तसेच पोलीस दल आणि अग्निशमन दलाने जखमींचा शोध घेवून त्यांना घटनास्थळी तैनात केलेल्या वैद्यकीय पथकाकडे पाठविण्यास सुरुवात केली. घटनेचे गांभीर्य पाहता इमारतीखाली काहीजण अडकल्याची शक्यता लक्षात घेवून इन्सीडंट कमांडर यांनी तातडीने पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलाशी (एनडीआरएफ) संपर्क साधून शोध व बचाव कार्यासाठी एक पथक पाठविण्याची विनंती केली. तसेच हे पथक लवकर पोहचण्यासाठी त्यांच्या विनंतीनुसार त्यांना ग्रीन कॉरिडॉरनिर्माण करण्यात आला.

एनडीआरएफचे पथक दाखल होण्यापूर्वी पोलीस, होमगार्ड आणि अग्निशमन दलाने भूकंपग्रस्त इमारत परिसरातील जखमी व्यक्तींना उपचारासाठी रवाना केले. निरीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखालील एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी पोहोचताच इन्सीडंट कमांडर यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. इमारतीमध्ये आणखी दोन व्यक्ती अडकल्याचे समजताच त्यांनी त्वरित शोध कार्याला सुरुवात केली.

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीची सुटका करून त्याला त्वरित वैद्यकीय उपचारासाठी रवाना करण्यात आले. दुसऱ्या व्यक्तीचा ठावठिकाणा समजत नसल्याने एनडीआरएफच्या श्वान पथकाची मदत घेण्यात आली. या पथकातील प्रशिक्षित श्वानाने मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीचे ठिकाण शोधून दिले. त्यानंतर विविध साधनांचा वापर करून बेशुद्धावस्थेत असलेल्या एका गंभीर जखमीला एनडीआरएफ पथकाने मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले. त्यालाही लगेचच रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.

भूकंपाने जमिनोदोस्त झालेल्या इमारतीच्या लगत दुमजली इमारतीवर दोन व्यक्ती अडकल्याची माहिती ऑपरेशनल चिफ यांना मिळाली. त्यांनी त्वरित एनडीआरएफ पथकाला याविषयी सूचना देवून त्यांची सुटका करण्यास सांगितले. या पथकाने रस्सीच्या सहाय्याने दोन्ही व्यक्तींना सुखरूप खाली उतरविले. पोलीस दलामार्फत उपस्थितांना आवाहन करून आणखी कोणी इमारतीमध्ये अडकले नसल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर शोध व बचाव मोहीम थांबविण्यात येत असल्याची घोषणा इन्सीडंट कमांडर यांनी केली.

भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीचे व्यवस्थापन करताना सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय राहावा, त्यांची क्षमता बांधणी व्हावी, या उद्देशाने आयोजित केलेल्या रंगीत तालमीत सर्वच यंत्रणांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली कामगिरी चोखपणे बजाविली. भूकंपग्रस्त इमारतीतील जखमींचा शोध घेवून त्यांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी तत्परतेने कार्यवाही केली.

याप्रसंगी लातूरचे तहसीलदार स्वप्नील पवार उपस्थित होते. रंगीत तालमीसाठी इन्सीडंट कमांडर म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकिब उस्मानी यांनी काम पहिले, तर ऑपरेशनल चिफची जबाबदारी औसा येथील मंडळ अधिकारी आर. एस. हाश्मी यांनी पार पाडली. इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरची इन्चार्ज म्हणून तेरणा कालवा प्रकल्पाचे शाखा अभियंता सोमेश्वर होळकर यांनी तर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयाचे डॉ. धीरज पाटील यांनी लायझनिंग ऑफिसर म्हणून आपली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर उपकेंद्राचे डॉ. प्रमोद पाटील यांनी निरीक्षक म्हणून काम पहिले.

राखीव पोलीस उपनिरीक्षक दिलीप माने यांच्यासह पोलीस दलाचे जवान या रंगीत तालमीसाठी सहभागी झाले होते. तसेच लातूर महानगरपालिका अग्निशमन दलाचे जवान, आरोग्य विभागाचे पथक, डायल 108 रुग्णवाहिका, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर उपकेंद्र आणि शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या रंगीत तालमीमध्ये सहभाग नोंदविला.

प्रारंभी लातूर महानगरपालिका अग्निशमन दलाचे जवानांनी लहान, मोठ्या स्वरूपातील आगी आटोक्यात आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच या साधनांची माहिती दिली. जिल्हा क्रीडा संकुल येथे अत्याधुनिक शोध व बचाव साहित्याचे प्रदर्शन यावेळी लावण्यात आले होते. त्यालाही नागरिक, विद्यार्थ्यांनी भेट देवून त्याविषयी माहिती घेतली.

 












 

*****

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा