‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात 'वैरण विकास योजना' सुरू

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात 'वैरण विकास योजना' सुरू • चारा बियाण्यांसाठी १०० टक्के अनुदान • २८ मे पर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहन लातूर, दि. २० (जिमाका): हवामान विभागाने यंदाच्या वर्षात ‘एल निनो’च्या प्रामुख्याने प्रभावामुळे पावसाचे असमान वितरण, कमी पर्जन्यमान आणि संभाव्य दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली असून या पार्श्वभूमीवर भविष्यात पशुखाद्य व हिरव्या चाऱ्याची गंभीर टंचाई निर्माण होवू शकते. ही संभाव्य टंचाई लक्षात घेऊन जिल्ह्यातील पशुपालकांनी आतापासूनच नियोजन करुन चारा उत्पादन वाढविणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. या समस्येवर मात करण्यासाठी सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत “वैरण विकास योजना – चारा उत्पादक कार्यक्रम” राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत पात्र पशुपालकांना १०० टक्के अनुदानावर संकरीत मका व ज्वारी बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पशुपालकांनी या संधीचा लाभ घेऊन स्वतःच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात हिरव्या चाऱ्याचे उत्पादन करावे आणि भविष्यातील टंचाई लक्षात घेऊन तयार होणारा चारा सायलेज, हाय किंवा चारा साठवण पद्धतीद्वारे जतन करून ठेवावा, असे आवाहनही जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केले आहे. या योजनेची प्रमुख उद्दिष्टे भविष्यातील चारा टंचाई टाळणे, पशुधनासाठी वर्षभर पौष्टिक हिरवा चारा उपलब्ध करणे, दूध उत्पादन वाढीस चालना देणे, पशुपालकांचे आर्थिक नुकसान कमी करणे आणि नैसर्गिक आपत्ती व दुष्काळ परिस्थितीत पशुधन संरक्षण करणे ही आहेत. या योजनेतंर्गत वैयक्तिक शेतकरी व नोंदणीकृत शेतकरी समूह गटांना १०० टक्के अनुदानावर चारा बियाणे व ठोंबे उपलब्ध करून दिले जाणार असून, त्यांना हिरवा चारा उत्पादनासाठी प्रोत्साहन आणि चारा साठवणुकीबाबत मार्गदर्शनही केले जाईल. योजनेच्या पात्रता निकषानुसार वैयक्तिक शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन, सिंचन सुविधा, किमान ३ ते ४ पशुधन असणे आणि १ हेक्टर क्षेत्रावर चारा उत्पादन घेण्याची तयारी असणे आवश्यक आहे; तर शेतकरी समूह गटांसाठी नोंदणीकृत समूह गट असणे आवश्यक असून ५ हेक्टर क्षेत्राची मर्यादा लागू राहील. अनुदानाच्या स्वरूपाचा विचार केला असता, वैयक्तिक लाभार्थ्याला १ हेक्टरसाठी चार हजार रुपयांपर्यंत १०० टक्के अनुदान, तर शेतकरी समूह गटाला ५ हेक्टरसाठी २० हजार रुपयांपर्यंत अनुदान अनुज्ञेय राहील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सातबारा उतारा, लागू असल्यास वनहक्क प्रमाणपत्र, पशुधनाचा पुरावा आणि समूह गट नोंदणी प्रमाणपत्र (लागू असल्यास) ही आवश्यक कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे. या योजनेतंर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दि. २० ते २८ मे २०२६ या कालावधीत सुरू राहणार असून, अर्जासाठीची गुगल फॉर्म लिंक जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज उत्पादित केलेला आणि योग्य पद्धतीने साठवून ठेवलेला चारा भविष्यातील दुष्काळ व टंचाई काळात पशुधनासाठी जीवनदायी ठरणार असल्याने प्रत्येक पशुपालकाने ही योजना गांभीर्याने घेऊन तात्काळ अर्ज करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित तालुका पशुसंवर्धन कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना किंवा जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय, लातूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन लातूरचे जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. पडीले आर. डी. यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत