विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी 'बेनिफिशरी सत्यापन ॲप'द्वारे डिजीटल हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी 'बेनिफिशरी सत्यापन ॲप'द्वारे
डिजीटल हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
लातूर, दि. २९ : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ७ मे, २०२६ च्या शासन निर्णयानुसार, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांसाठी आता हयात प्रमाणपत्र (डिजीटल लाईफ सर्टिफिकेट) ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लातूर तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच इतर सर्व विशेष सहाय्य योजनांच्या सर्व लाभार्थ्यांनी आपले डिजीटल हयात प्रमाणपत्र विहित पद्धतीने सादर करावे, असे आवाहन लातूर तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
मोबाईल किंवा सेतू केंद्रावरून सुविधा उपलब्ध
लाभार्थ्यांना हे प्रमाणपत्र सादर करणे सोपे जावे यासाठी 'बेनिफिशरी सत्यापन ॲप' विकसित करण्यात आले आहे. लाभार्थी हे प्रमाणपत्र स्वतःच्या किंवा आपल्या नातेवाईकांच्या मोबाईलवरून या ॲपचा वापर करून सादर करू शकतात. तसेच ज्यांना मोबाईलवर ही प्रक्रिया करणे शक्य नाही, त्यांनी जवळच्या सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरी सेवा केंद्राला भेट देऊन आपले डिजीटल हयात प्रमाणपत्र काढून घ्यावे.
ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक लाभार्थ्यांना ही ऑनलाईन प्रक्रिया स्वतः करणे शक्य नसते. अशा वेळी लाभार्थ्यांनी आपल्या नातेवाईकांची मदत घ्यावी अथवा जवळच्या सेतू सुविधा केंद्राचा लाभ घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी. जेणेकरून लाभार्थ्यांचे अनुदान विनाअडथळा सुरू राहण्यास मदत होईल, असे आवाहन लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
****
Comments
Post a Comment