लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना; लातूर जिल्ह्यात २ टँकर, ७५ खाजगी विहिरींचे अधिग्रहण

लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना; लातूर जिल्ह्यात २ टँकर, ७५ खाजगी विहिरींचे अधिग्रहण लातूर, दि. २३ : जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, लातूर यांच्या वतीने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबवल्या जात आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येत आहे. सद्यस्थितीत जळकोट तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्यामुळे तिथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जळकोट तालुक्यातील २ गावे आणि १ वाडी अशा एकूण ३ ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवले जात असल्यामुळे सुमारे ३,३१० नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासाठी शासनाचे २ टँकर कार्यरत असून त्यांच्या दररोज एकूण ४ फेऱ्या मंजूर करण्यात आल्या आहेत. या सर्व फेऱ्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. प्रामुख्याने जळकोट तालुक्यातील शिवाजी नगर तांडा - वाघमारी तांडा आणि गव्हाण येथे टँकर मंजूर करण्यात आले आहेत. टँकर व्यतिरिक्त जिल्ह्यातील इतर गावांमध्ये पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे जिल्ह्यात एकूण ६५ गावे आणि वाड्यांमध्ये ७५ विहिरी किंवा विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. अहमदपूर तालुक्यात २५ गावे व वाड्यांमध्ये ३० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर औसा तालुक्यात १७ गावांमध्ये २२ विहिरी, उदगीर तालुक्यात १० गावांमध्ये ११ विहिरी, चाकूर तालुक्यात ४ गावांमध्ये ४ विहिरी, रेणापूर तालुक्यात ३ गावांमध्ये ३ विहिरी, लातूर तालुक्यात १ गावात १ विहीर आणि जळकोट तालुक्यात ५ गावांमध्ये ४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाचे पाणी टंचाई निवारण पथक संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांच्या मागणीनुसार तात्काळ उपाययोजना राबवण्यास कटिबद्ध असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत सांगण्यात आले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन