लातूर जिल्ह्यात शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; 'स्वाधार' योजनेसाठीही वसतिगृहाचा अर्ज बंधनकारक
लातूर जिल्ह्यात शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू;
'स्वाधार' योजनेसाठीही वसतिगृहाचा अर्ज बंधनकारक
लातूर, दि. २७ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत मुलांची १४ व मुलींची १२ अशी एकूण २६ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. यामध्ये लातूर शहरात मुलांचे ६ तर मुलींचे ४ वसतिगृह; औसा, निलंगा, उदगीर, देवणी व चाकूर येथे प्रत्येकी मुलांचे १ व मुलींचे १; अहमदपूर येथे मुलांचे २ व मुलींचे २; तर रेणापूर येथे मुलांचे १ आणि जळकोट येथे मुलींचे १ वसतिगृह कार्यरत आहे. या सर्व वसतिगृहांची सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली असून, पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्यासाठी https://hmas.mahait.org या लिंकचा वापर करावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.
या प्रवेश प्रक्रियेत जिल्ह्यात इयत्ता आठवी व अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या, तसेच बिगर व्यावसायिक पदवी, पदविका (डिप्लोमा) प्रथम वर्षात आणि पदव्युत्तर प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) प्रवेश अर्ज भरता येईल. याशिवाय थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना (इयत्ता ८ वी) ३० जून, २०२६ पर्यंत, तर कनिष्ठ महाविद्यालय व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना १५ जुलै, २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
या शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांचा जर जागेअभावी वसतिगृहात प्रवेश निश्चित झाला नाही, तर अशा पात्र विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा ऑनलाईन पद्धतीने लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी वसतिगृह प्रवेशासाठी निवड न झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशाचा मूळ अर्ज भरलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा स्वतंत्र अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये कोणतीही सुविधा देण्यात येणार नाही आणि पर्यायाने त्यांना स्वाधार योजनेचा लाभही मिळणार नाही. तरी इच्छुकांनी मुदतीपूर्वी ऑनलाईन लिंकचा वापर करून, तसेच स्थानिक गृहप्रमुख किंवा गृहपाल यांच्याशी संपर्क साधून आपले प्रवेश अर्ज निश्चित करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
****
Comments
Post a Comment