महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा रविवारी; लातूर शहरातील ९ परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा रविवारी;
लातूर शहरातील ९ परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
लातूर, दि. २६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवार, ३१ मे २०२६ रोजी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ आयोजित करण्यात आली असून, या परीक्षेच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लातूर शहरातील परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये शहरातील ९ परीक्षा उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरामध्ये हे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा ३१ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ अशा दोन सत्रांमध्ये पार पडणार असून हे आदेश परीक्षेच्या दिवशी सकाळी ०८.०० वाजेपासून ते सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत लागू राहतील. या आदेशानुसार परीक्षा केंद्र परिसरात प्रवेश करतेवेळी परीक्षार्थीं व्यतिरिक्त ५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रितरीत्या प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानटपऱ्या, टायपिंग सेंटर्स, एसटीडी बूथ आणि ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवावी लागणार आहेत. परीक्षा सुरळीत व शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी केंद्र परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास, शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास आणि कोणत्याही अनाधिकृत व्यक्ती वा वाहनास प्रवेश करण्यास सक्त मनाई असेल. याशिवाय परीक्षा केंद्र परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर कोणतीही प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. हे प्रतिबंधात्मक आदेश परीक्षा उपकेंद्रावर कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थींवर निगराणी ठेवणारे पर्यवेक्षक आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या परीक्षाविषयक कर्तव्याच्या अनुषंगाने लागू असणार नाहीत.
लातूर शहरातील नांदेड रोडवरील यशवंत विद्यालय, खाडगाव रोडवरील सरस्वती विद्यालय, नांदेड रोडवरील जिजामाता कन्या प्रशाला, नारायण नगरमधील परिमल माध्यमिक विद्यालय, दयाराम रोडवरील श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय, सरस्वती कॉलनीतील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शाहू चौकातील ज्ञानेश्वर विद्यालय, नंदी स्टॉप येथील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) महाविद्यालय आणि श्याम नगरमधील श्री केशवराज विद्यालय येथे परीक्षा होणार आहे.
*****
Comments
Post a Comment