नवतंत्रज्ञानाचा प्रसार व प्रशिक्षणातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य – जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड • लातूरमध्ये पशुवैद्यकांसाठी विभागीय तांत्रिक चर्चासत्र
वृत्त क्र. : 476
नवतंत्रज्ञानाचा प्रसार व प्रशिक्षणातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य
– जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड
• लातूरमध्ये पशुवैद्यकांसाठी विभागीय तांत्रिक चर्चासत्र
लातूर, दि. १४ (जिमाका) : दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणे आवश्यक आहे. त्यासाठी पशुपालकांपर्यंत नवतंत्रज्ञान पोहोचविणारे विस्तार शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले.
ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान, पशुसंवर्धन विभाग आणि एमएसडी पशु आरोग्य यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भविष्योन्मुख पशुवैद्यकीय सेवा : उदयोन्मुख तंत्रज्ञान, वैज्ञानिक प्रगती आणि शाश्वत पशुधन आरोग्य’ या विषयावर पशुवैद्यकांसाठी विभागीय तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. नानासाहेब सोनवणे, ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर बिडवई, वनामकृविचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, ज्येष्ठ पशुवैद्यक शास्त्रज्ञ तथा माफसूचे माजी विस्तार शिक्षण संचालक प्रा. डॉ. अनिल भिकाने, राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी (एमएसडी) व पशुप्रजनन तज्ज्ञ डॉ. उमेश कुंभार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले, डॉ. सखाराम खुणे, डॉ. आर. डी. कदम, कार्याध्यक्ष डॉ. अरविंद देशपांडे व सचिव डॉ. रवींद्र डावरे उपस्थित होते.
चर्चासत्रात प्रा. डॉ. अनिल भिकाने म्हणाले की, प्रतिजैविक प्रतिरोधकता ही पशुवैद्यकीय व मानवी आरोग्यासमोरील अत्यंत गंभीर जागतिक समस्या बनली आहे. जिवाणूजन्य आजारांवरील उपचार टाळणे हा यावर उपाय नसून, प्रतिजैविकांचा जबाबदारीने, वैज्ञानिक पद्धतीने, अचूक निदानाच्या आधारे आणि केवळ आवश्यकतेनुसारच वापर करणे गरजेचे आहे. उपचारप्रधान पशुवैद्यकीय सेवेकडून आता प्रतिबंधात्मक व पूर्वानुमानाधारित पशुवैद्यकीय सेवेकडे वाटचाल करणे ही काळाची गरज आहे. भविष्यातील पशुवैद्यक हा केवळ उपचार करणारा चिकित्सक न राहता कळप आरोग्य तज्ज्ञ, रोगसाथशास्त्रज्ञ, अन्नसुरक्षा तज्ज्ञ आणि 'वन हेल्थ' तत्त्वज्ञानाचा प्रभावी समन्वयक म्हणून बहुआयामी भूमिका पार पाडेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
पशुप्रजनन तज्ज्ञ डॉ. उमेश कुंभार यांनी दुग्ध उत्पादन वाढीसाठी गाई-म्हशींची प्रजननक्षमता वाढविण्याचे महत्त्व विशद केले. वंध्यत्व उपचारामध्ये संप्रेरकांचा वापर हा नेहमी अंतिम पर्याय असावा. त्याआधी जनावरांना संतुलित व पोषक आहार देणे, तसेच गर्भाशयातील संसर्गावर योग्य उपचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या चर्चासत्रास उपायुक्त डॉ. दीपक मुळे, उपायुक्त डॉ. शिवाजी बुचाले, डॉ. अतुल टापर, डॉ. भास्कर बोरगावकर, एमएसडीचे श्री. राजेंद्र क्षीरसागर, डॉ. राजशेखर दडके, डॉ. एस. एम. नेरळकर यांच्यासह लातूर, बीड, धाराशिव, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील सहाय्यक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी आणि मोठ्या संख्येने पशुवैद्यक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी चर्चासत्रामागील भूमिका स्पष्ट केली. डॉ. चंद्रशेखर बिडवई यांनी ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला, तर डॉ. नानासाहेब सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी केले, तर एमएसडी पशु आरोग्याचे प्रक्षेत्र व्यवस्थापक श्री. कुणाल घुंगार्डे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
****
Comments
Post a Comment