९० टक्के अनुदानावर मिळणार ठिबक आणि तुषार सिंचन • महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

९० टक्के अनुदानावर मिळणार ठिबक आणि तुषार सिंचन • महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. १४ : जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधवांच्या शाश्वत विकासासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना (प्रति थेंब अधिक पीक) सन २०२६-२०२७ अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर ठिबक व तुषार सिंचन योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. या कल्याणकारी योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक तसेच बहुभूधारक अशा दोन्ही गटांतील पात्र शेतकऱ्यांना विविध उपयोजनांच्या माध्यमातून एकत्रितपणे एकूण ९० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ५५ टक्के, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून २५ टक्के पूरक अनुदान आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना किंवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून उर्वरित १० टक्के पूरक अनुदान मिळून एकूण ९० टक्के अनुदान दिले जाईल. त्याचप्रमाणे दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या बहुभूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ४५ टक्के, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून ३० टक्के आणि संबंधित स्वावलंबी योजनांमधून १५ टक्के पूरक अनुदान मिळून एकूण ९० टक्के अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा प्रत्यक्ष शेतीत वापर केल्यामुळे पिकांच्या उत्पादनात आणि उत्पादकतेत मोठी वाढ होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे पाण्याचा काटकसरीने वापर होत असल्याने शेतातील अनावश्यक तणांची वाढ रोखता येते आणि उपलब्ध पाण्यातच अधिक क्षेत्र ओलिताखाली आणणे शक्य होते. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील पात्र शेतकरी बांधवांनी महाडीबीटीच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर आपले ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत