आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘चरण सेवा' उपक्रमात लातूर येथे २५० पेक्षा अधिक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी • मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा उपक्रम
आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘चरण सेवा' उपक्रमात लातूर येथे २५० पेक्षा अधिक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी
• मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा उपक्रम
लातूर, दि. १३ : मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, वसंतराव काळे होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय आणि लातूर शहर महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारीनिमित्त 'चरण सेवा' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १२ आणि १३ जुलै २०२६ रोजी लातूर येथील श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर मंदिर येथे झालेल्या या उपक्रमात २५० पेक्षा अधिक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व मोफत उपचार करण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या सद्गुरु श्री गुंडा महाराज संस्थानच्या दिंडीची परंपरा अनेक वर्षांपासून अखंड सुरू आहे. या दिंडीसोबत शेकडो वारकरी पायी वारी करून श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. वारकऱ्यांच्या या पायी प्रवासामुळे होणारा शारीरिक थकवा कमी करणे, त्यांच्या पायांची व स्नायूंची योग्य काळजी घेणे तसेच आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, या उद्देशाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या नेतृत्वामध्ये राज्यभर 'चरण सेवा' उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड व निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात सुमारे ६० वैद्यकीय व निमवैद्यकीय तज्ज्ञांच्या चमूने २५० हून अधिक वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी, चरण सेवा व औषधोपचार उपलब्ध करून दिले. वसंतराव काळे होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयातर्फे वारकऱ्यांना आयुष उपचार पद्धतीद्वारे आवश्यकतेनुसार उपचार करण्यात आले. तसेच लातूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय चमुमार्फत रुग्णांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार औषधी देण्यात आली. या प्रसंगी संस्कार भारतीच्या चमूकडून काढण्यात आलेली आकर्षक रांगोळी आणि फुलांची सजावट सर्वांचे मुख्य आकर्षण ठरली होती.
सद्गुरु श्री गुंडा महाराज संस्थानचे दिंडी प्रमुख श्री गुरुराज महाराज यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, यामुळे वारकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचे सांगितले. हा स्तुत्य उपक्रम यशस्वी करण्यासाठी वसंतराव काळे होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. विकास निलंगेकर व डॉ. सुनीता निलंगेकर आणि त्यांची टीम, आरोग्य विभाग लातूर शहर महानगरपालिका, संस्कार भारती संस्था, तसेच इतर सर्व सेवेकरी व स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.
***
Comments
Post a Comment