कुष्ठमुक्तीसाठी लातूर जिल्ह्यात 16 ते 20 डिसेंबर 2024 दरम्यान ‘कुसुम’ अभियान

 

कुष्ठमुक्तीसाठी लातूर जिल्ह्यात

16 ते 20 डिसेंबर 2024 दरम्यान कुसुम’ अभियान

लातूर,दि.13:- शाश्वत विकास ध्येयाच्या अंतर्गत केंद्र शासनाने सन 2027 पर्यंत शुन्य कुष्ठरुग्ण प्रसार हे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी कुष्ठरुग्ण शोधून त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे आवश्यक आहे. यासाठी लातूर जिल्ह्यात 16 ते 20 डिसेंबर 2024 दरम्यान कुसुम’ अर्थात ‘कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र’ अभ्यिान राबविण्यात येणार आहे.

विटभट्टी कामगार, खाण कामगार स्थलांतरीत व्यक्ती, बांधकाम मजूर, निवासी, आश्रमशाळेत राहणारे विद्यार्थी, कंपनीत काम करणारे कामगार हे कामासाठी , मजूरीसाठी लवकर घर सोडतात व उशिरा घरी परत येतात. यामुळे अशा व्यक्तींची आरोग्य तपासणी नियमीत सर्वेक्षण अथवा कुष्ठरोग शोध मोहिमेमध्ये होत नाही. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व जिल्ह्यांमध्ये 16 ते 20 डिसेंबर 2024 या कालावधीत अतिजोखमीच्या भागात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) हे अभियान राबविण्यात येणार आहे.

कुसुम अभियानाअंतर्गत वेगवेगळ्या उपेक्षित गटांचे 16 ते 20 डिसेंबर 2024 या कालावधीत आशा व पुरुष स्वयंसेवक यांच्या मदतीने प्रत्यक्ष सर्वेक्षण होणार आहे. जिल्ह्यात 291 उपेक्षित ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करुन जवळपास 31 हजार 760 व्यक्तींची शारिरीक तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीसाठी जिल्ह्यात 21 पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच 4 पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. या मोहिमेमध्ये शोधलेल्या संशयित रुग्णांची वैद्यकीय अधिकारी तपासणी करून निदान करणार आहेत व उपचार देणार आहेत. तसेच कुष्ठरुग्णांच्या सहवासात असलेल्या व्यक्तींना कुष्ठरोगाची लागण होवू नये, म्हणून रीफॅपीसीन गोळीची एक मात्रा (पीईपी) देण्यात येणार आहे. तरी तपासणीसाठी घरी येणाऱ्या पथकामार्फत तपासणी करून घेण्यात यावी,  असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा