दिव्यांग क्रीडा स्पर्धांमध्ये सुमारे ६०० विद्यार्थ्यांचा सहभाग दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन - मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर
दिव्यांग क्रीडा स्पर्धांमध्ये सुमारे ६०० विद्यार्थ्यांचा सहभाग
दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन - मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर
लातूर, दि. ०६ : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेमार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, सांस्कृतिक स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामुळे दिव्यांग विद्यार्थ्याना आपले कला, क्रीडा कौशल्य विकसित करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी आज येथे व्यक्त केला.
बाभळगाव पोलीस मुख्यालय मैदान येथे आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रंसगी श्री. सागर बोलत होते. समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी, महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, समाज कल्याण अधिकारी विलास केंद्रे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे व्यंकट लामजाने यावेळी उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आजपर्यंत विविध पातळीवर आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून सुवर्ण, रौप्य व कास्यपदकांची कमाई केली आहे. त्यांनी केलेली कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे. या विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांचा विकास करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा पातळीवर होणारी क्रीडा स्पर्धा उपयुक्त ठरणार आहे. शासन, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यात दिव्यांग बांधवांसाठी अतिशय चांगले उपक्रम राबविले जात आहेत. या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे श्री. सागर म्हणाले.
लातूर जिल्ह्यातील ५१ शाळांमधील जवळपास ६०० दिव्यांग विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. दिव्यांगत्व प्रकारानुसार आणि वयोगटानुसार ९२ विविध गटात स्पर्धा होणार असल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी प्रास्ताविकात सांगितले.
प्रारंभी स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्साही वातावरणात पथसंचलन केले. त्यानंतर क्रीडाज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली. तसेच महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यासोबतच भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी भारतीय राज्यघटनेची प्रत भेट देवून उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता राजू गायकवाड यांनी केले.
***
Comments
Post a Comment