जिल्ह्यातील १०० दिवशीय क्षयरोग अभियान व शिबिराचे आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते उद्घाटन

 

जिल्ह्यातील १०० दिवशीय क्षयरोग अभियान व शिबिराचे

आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते उद्घाटन

 

लातूर,दि.10 (जिमाका): राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १०० दिवशीय क्षयरोग मोहीम राबविण्यात येत आहे. लातूर जिल्हा क्षयरोग केंद्र व वसंतराव काळे होमिओपॅथीक महाविद्यालय व हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज वसंतराव काळे होमिओपॅथीक महाविद्यालय व हॉस्पीटल येथे आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते निक्षय वाहनास हिरवा झेंडा दाखवून व क्षयरुग्ण शोध मोहीमेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपक लांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.तांबारे एस.एन., मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शंकर भारती,  वसंतराव काळे होमिओपॅथीक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. खामितकर एस.सी., उपप्राचार्य डॉ.अतुल कुलकर्णी उपस्थित होते.

वसंतराव काळे होमिओपॅथीक महाविद्यालय व हॉस्पीटल येथील विद्यार्थ्यांनी क्षयरोगाची लक्षणे, निदान व उपचार याबाबत पथनाट्य सादर केले. आमदार विक्रम काळे यांनी उपस्थितांना जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी गावपातळीवर मोहीम राबवित असताना १०० दिवशीय क्षयरोग मोहीमेअंतर्गत जनजागृती व क्षयरोग रुग्ण शोधण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे अश्वासन दिले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी सर्व आरोग्य संस्थेमध्ये गाव पातळीवर क्षयरोग शोध मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी अतिजोखमीच्या व्यक्तीमध्ये, तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरीकांनी क्षयरोगाबाबतची तपासणी करुन निदान निश्चितीनंतर संपूर्ण उपचार करुन घ्यावे. क्षयरोगाबाबतच्या गैरसमजूती समुपदेशनामार्फत दूर कराव्यात. तसेच औद्योगिक संस्था, दानशुर व्यक्ती तसेच सर्व शासकीय विभाग, शिक्षण, पंचायतराज, समाज कल्याण, लोकप्रतिनिधी, औद्योगिक संस्थांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्यासाठी सूचना केल्या.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी यावेळी क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमामध्ये क्षयरोग मुक्तीसाठी झालेले निदान व उपचारमधील बदल नमूद केले आहे. तसेच १०० दिवशीय क्षयरोग मोहीमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागामार्फत जास्तीत जास्त प्रसिध्दी, जनजागृती, संशयितांची तपासणी शिबिरे घेवून जनतेपर्यंत आरोग्य सेवा पोहचाव्यात व जिल्हा क्षयरोग मुक्त करावा, असे अवाहन केले.

या कार्यक्रमाध्ये निक्षय मित्र व टीबी चॅम्पीयन यांचा मान्यवराच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

प्रस्ताविक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.तांबारे एस.एन, यांनी केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पवार आर.एच., जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राऊत एच.के., डॉ.बांगर ए.आर., डॉ.रमेश बगडे, शहर नोडल अधिकारी, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ.सम्यक खैरे, जिल्हास्तरीय कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, समूदाय आरोग्य अधिकारी, वसंतराव काळे होमिओपॅथीक महाविद्यालय व हॉस्पीटल येथील प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी, आशा स्वंयसेविका, व नागरीक यावेळी उपस्थित होते. निक्षय शिबीराअंतर्गत एकूण ८३ नागरीकांची तपसणी करुन ७२ अनुमानितांचे थुंकी नमुने घेण्यात आले. ८२ जणांची एक्स-रे मशीनद्वारे तपासणी करण्यात आली.  

****




Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा