रब्बी हंगाम पीक स्पर्धेसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

रब्बी हंगाम पीक स्पर्धेसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

लातूर, दि.26 (जिमाका) : कृषि विभागामार्फत रब्बी हंगामा अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या राज्यांतर्गत पीक स्पर्धांचे आयोजन करण्यात आहे. या स्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी 31 डिसेंबर 2024 पर्यंत तालुका कृषि अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. सर्वसाधन व आदिवासी गटात ही स्पर्धा होईल.

हरभरा, गहु, करडई, व व जवस या पिकांसाठी रब्बी पीक स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठीशेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर (एक एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

तालुकास्तर, जिल्हास्तर, व राज्यस्तरावरील पीक स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील. पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम 300 रुपये, आदिवासी गटासाठी 150 रुपये प्रवेश शुल्क राहील. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी शेतकरी बांधवांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव यांनी केले आहे.


अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे


• विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ),

• ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन

• सातबारा, 8-अ चा उतारा,

• जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास)

• पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सातबारावरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा,

• बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.


अशी आहे बक्षिसांची रक्कम

रब्बी पीक स्पर्धेसाठी तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस पाच हजार रुपये, द्वितीय बक्षीस तीन हजार रुपये आणि तृतीय बक्षीस दोन हजार रुपयांचे राहील. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस दहा हजार रुपये, द्वितीय बक्षीस सात हजार रुपये आणि तिसरे बक्षीस पाच हजार रुपये राहील. तसेच राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस पन्नास हजार रुपये, द्वितीय बक्षीस चाळीस हजार रुपये आणि तिसरे बक्षीस तीस हजार रुपये राहणार आहे.



****

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा