दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी सात रुपये अनुदान

 

दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी सात रुपये अनुदान

*लातूर, दि. 27 :* राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी दूध खरेदी दराच्या चढ उतारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या अनुषंगाने राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ व खाजगी दूध प्रकल्प यांना गाय दूध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादकांना प्रति लिटर 7 रुपये अनुदान देण्यात येत आहे.  

सहकारी दूध उत्पादक संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध गुणप्रत 3.5, 8.5 फॅट, एसएनएफ या गुणप्रतिच्या दुधासाठी प्रति लिटर 28 रुपये दूध खेरदी दर देणे आवश्यक आहे. तसेच कमीत कमी 3.2 फॅट, 8.3 एसएनएफपर्यंत गुणप्रत असलेल्या दुधासाठी ही योजना लागू आहे. तसेच 3.5, 8.5 फॅट , एसएनएफ या गुणप्रतिपेक्षा प्रति पाँईंट कमी , अधिक होणाऱ्या फॅट व एसएनएफसाठी प्रत्येकी 30 पैसे वजावट, अधिक करण्यात येणार आहे.

या योजनेच्या अंमलबजवणीसाठी विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेले असून अनुदान पात्र गाय दुधासाठी प्रति लिटर 7 रुपये अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे. डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते, आधारकार्ड व दुधाळ जनावरांचे करण्यात आलेली ईआर टॅगिंग ही भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.

दूध अनुदान योजनेच्या 26 सप्टेंबर, 2024 च्या शासन निर्णयानुसार लातूर जिल्ह्यातील कार्यान्वित असलेले सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणारा एकही दूध उत्पादक शेतकरी योजनेपासून वंचित राहू नये, याकरिता लातूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्ह्याच्या जिल्हा दूग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालय व जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. पशुसंवर्धन विभागामार्फत लातूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गाय, म्हैस यांची ईआर टॅगिंग करुन भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी करण्याबाबतची मोहिम सुरु करण्यात आलेली आहे. त्यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्वच दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपआपल्या गावालगतच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.

जिल्ह्यातील कार्यान्वित असलेले सर्व सहकारी दूध संघ, खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आवश्यक बँक खाते, आधारकार्ड व दुधाळ जनावरांचे करण्यात आलेली ईआर टॅगिंगची माहिती देवून शासनाच्या दूध अनुदान योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी एम.एस. लटपटे यांनी केले आहे.  

***

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा