तळेगाव येथील शेतकऱ्यांशी मंत्री बाबासाहेब पाटील, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांचा संवाद

 





शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये, त्यांच्या जमिनींवर वक्फ बोर्डाचा दावा नसल्याची ग्वाही

लातूर, दि. २५ : एका व्यक्तीने वक्फ ट्रिब्यूनलमध्ये दावा दाखल करून अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील जवळपास १०० शेतकऱ्यांना जमिनीच्या ताब्याविषयी नोटीस बजावली आहे. या प्रकरणामुळे चिंतीत असलेल्या शेतकऱ्यांशी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी, आमदार अभिमन्यू पवार यांनी तळेगाव येथे जावून संवाद साधला. या प्रकरणातील जमिनी वक्फ बोर्डाच्या मालकीच्या नसल्याने बोर्डाने या जमिनींवर कोणताही हक्क सांगितलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे, असे वक्फ बोर्डाचे अध्यक्ष श्री. काझी यांनी सांगितले. तसेच या प्रकरणात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे ना. पाटील व आ. पवार यांनी सांगितले.

नोटीसा बजावलेल्या जमिनीची नोंद गॅझेटनुसार वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनींच्या नोंदीमध्ये नसल्याने वक्फ बोर्डाने दावा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीही शेतकऱ्यांमध्ये वक्फ बोर्डाबाबत गैरसमज निर्माण झाल्याने गावामध्ये शेतकऱ्यांसमोर भूमिका मांडण्यासाठी आलो असल्याचे श्री. काझी यावेळी म्हणाले. तसेच या प्रकरणात शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

या प्रकरणात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. शेतकऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी आवश्यक सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही दडपणाखाली न राहता निश्चिंत व्हावे, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले.

औसा तालुक्यातील बुधोडा येथील शेतकऱ्यांनाही अशाच नोटीसा आल्या आहेत. तळेगाव आणि. बुधोडा येथील शेतकऱ्यांना या प्रकरणात सर्व सहकार्य करण्यात येणार असून त्यांच्या जमिनी त्यांच्याच मालकीच्या राहतील, असा विश्वास आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी दिला.

प्रारंभी तळेगाव येथील सेवानिवृत्त प्राचार्य रमेश दापके, उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके यांनी शेतकऱ्यांना आलेल्या नोटीसांबद्दल सविस्तर माहिती दिली.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा