दक्षता व गुण नियंत्रण विभागामार्फत लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळ येथील अभियंत्यांना प्रशिक्षण
दक्षता व गुण नियंत्रण विभागामार्फत
लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळ येथील अभियंत्यांना प्रशिक्षण
लातूर, दि. 4 (जिमाका): सार्वजनिक बांधकाम मंडळ येथील शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांना छत्रपती संभाजीनगर दक्षता व गुणनियंत्रण विभाग व लातूर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावतीने 2 व 3 डिसेंबर, 2024 रोजी प्रशिक्षणाचे आयोजन येथील सार्वजनिक बांधकाम विभाग शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गाची सुरुवात 2 डिसेंबर, 2024 रोजी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून झाली.
लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता डॉ. शेख सलीम, छत्रपती संभाजीनगर दक्षता व गुणनियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सय्यद, नांदेडचे कार्यकारी अभियंता एम. बी. पवार, निलंगा सां.बा. विभागाचे कार्यकारी अभियंता जी. ए. क्षीरसागर, तुळजापूर येथील उपअभियंता विजय आवाळे, उपअभियंता श्री. बिराजदार, श्री. देवकर, सहाय्यक अभियंता रोहन जाधव यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये नव्याने रुजू झालेल्या कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांना यावेळी प्रशिक्षण देण्यात आले. तसेच नव्याने बांधण्यात येत असलेल्या सारथी येथील इमारत बांधकामावर प्रत्यक्ष भेट देऊन स्टील बांधणी, कॉक्रिट वर्क तसेच विविध मटेरियलच्या चाचण्या कशा कराव्यात, याची माहिती देण्यात आली. या प्रशिक्षण वर्गाला एकूण 110 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
या प्रशिक्षण वर्गाचे सुनियोजन व सर्व व्यवस्था दक्षता व गुणनियंत्रण लातूर उपविभागीय अधिकारी डी. डी. साठे व त्यांचे टीमने अतिशय चोखपणे केली. या प्रशिक्षण वर्गाला, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र नीलकंठ , उदगीर येथील कार्यकारी अभियंता सौ. अलका डाके, निलंगा येथील कार्यकारी अभियंता जी.ए. क्षीरसागर व लातूर जिल्ह्यातील सर्व उपविभागाचे उपअभियंता उपस्थित होते.
सर्व प्रशिक्षणार्थी यांना सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता एम. एन. गायकवाड, अधीक्षक अभियंता शेख सलीम, कार्यकारी अभियंता देवेंद्र नीलकंठ, जी. ए. क्षीरसागर, श्रीमती डाके यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. सूत्रसंचालन कनिष्ठ अभियंता भास्कर कांबळे यांनी केले.
****
Comments
Post a Comment