‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ उपक्रमात सहभागी व्हा; महाराष्ट्र शासनामार्फत मिळवा ऑनलाइन प्रमाणपत्र! लातूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था व नागरिकांना अमृतचे आवाहन

‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ उपक्रमात सहभागी व्हा; महाराष्ट्र शासनामार्फत मिळवा ऑनलाइन प्रमाणपत्र! लातूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था व नागरिकांना अमृतचे आवाहन लातूर, दि. 16 : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास, महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा समृद्ध वारसा आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. दिवाळीच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी ऐतिहासिक वारशाशी जोडले जावे, गड-किल्ल्यांचा इतिहास जाणून घ्यावा तसेच पुढील पिढीमध्ये इतिहासाविषयी अभिमान आणि संवर्धनाची भावना निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. उपक्रमात सहभागी कसे व्हाल? या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी, युवकांनी आणि नागरिकांनी आपल्या घरी, शाळेत किंवा परिसरात महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार कराव्यात. प्रतिकृती तयार केल्यानंतर त्यांची छायाचित्रे काढून अमृत दुर्गोत्सवच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करावीत. अधिकृत वेबसाईट : https://www.amrutdurgotsav.com या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सहभागींना सहभागाबद्दल महाराष्ट्र शासनामार्फत ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि युवकांना सर्जनशीलतेला वाव देण्यासोबतच महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची ओळख करून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सामाजिक संस्थांनीही सहभाग नोंदवावा लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शिक्षक, पालक, विद्यार्थी, युवक मंडळे, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि विविध संघटनांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. सामाजिक संस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थी, युवक आणि नागरिकांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचवून त्यांना गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्यासाठी तसेच छायाचित्रे अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी प्रोत्साहित करावे. गड-किल्ले हे केवळ ऐतिहासिक वास्तू नसून महाराष्ट्राच्या शौर्याचे, स्वाभिमानाचे आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून ऐतिहासिक वारशाविषयी जनजागृती निर्माण होऊन नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ या उपक्रमात लातूर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व या ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या चळवळीत योगदान द्यावे, असे आवाहन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत