सन २०२६-२७ मधील शिष्यवृत्ती अर्जांसाठी महाडीबीटी आणि नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलबाबत सुधारित सूचना जारी

सन २०२६-२७ मधील शिष्यवृत्ती अर्जांसाठी महाडीबीटी आणि नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलबाबत सुधारित सूचना जारी लातूर, दि. १९ : सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी इतर मागासवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) आणि आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज भरण्यासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल आणि महाडीबीटी २.० पोर्टलबाबत इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक कार्यालयामार्फत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 'पीएम यशस्वी प्री-मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम फॉर ओबीसी, ईबीसी अँड डीएनटी' या योजनेअंतर्गत इयत्ता नववी व दहावीमध्ये शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा विजाभज व विमाप्र प्रवर्गातील मुला-मुलींनी आपले शिष्यवृत्ती अर्ज केवळ नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवरच (एनएसपी) भरणे बंधनकारक आहे. यासोबतच मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीअंतर्गत ओबीसी, एसबीसी आणि विजेएनटी प्रवर्गातील २.५ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या इतर मागासवर्गीय मुलींसाठीच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे सर्व नवीन (फ्रेश) अर्ज फक्त एनएसपी पोर्टलवरच स्वीकारले जातील; या योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर नवीन अर्जांची सुविधा उपलब्ध असणार नाही. त्यामुळे शाळा व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आपल्या स्तरावरून विद्यार्थ्यांना त्वरित आवश्यक सूचना द्याव्यात. इयत्ता नववी व दहावीच्या ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मुलींचे अर्ज, इयत्ता पाचवी व आठवीच्या मुलींसाठीची सावित्रीबाई फुले योजना, तसेच गुणवंत शिष्यवृत्ती (जिल्हा परिषद), ट्युशन व परीक्षा फी सवलत, बीपीएल विद्यार्थी आणि सैनिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठीचा देखभाल भत्ता या योजनांचे अर्ज पूर्ववत महाडीबीटी २.० पोर्टलवर भरावेत. तसेच, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती (इयत्ता ११ वी व १२ वी विजेएनटी/एसबीसी), व्यावसायिक अभ्यासक्रमातील वसतिगृह निर्वाह भत्ता, व्यावसायिक शिक्षण/प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, शासकीय किंवा खाजगी आयटीआयमधील विद्यार्थ्यांसाठीची प्रशिक्षण शुल्क परतफेड योजना आणि शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती या सात योजनांचे अर्जदेखील महाडीबीटी २.० पोर्टलवरच सादर करावयाचे आहेत. नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर (एनएसपी) अर्ज भरण्यासाठी केंद्र शासनाकडून निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याची प्रक्रिया १ जुलै २०२६ पासून सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ नोव्हेंबर २०२६ पर्यंत असणार आहे. त्यानंतर अर्जांमधील त्रुटी व पडताळणीसाठी १५ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली असून, ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत डीएनओ, एसएनओ आणि एमएनओ स्तरावरील अंतिम पडताळणी प्रक्रिया सुरू राहणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत आपले अर्ज अचूकपणे सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक अभय अटकळ यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत