शासकीय वसतिगृह आणि स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागामार्फत आवाहन
शासकीय वसतिगृह आणि स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन
अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागामार्फत आवाहन
लातूर, दि. १९ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये मुलांची १४ आणि मुलींची १२ अशी एकूण २६ शासकीय वसतिगृहे कार्यरत असून यामध्ये लातूर शहरात मुलांची ६ व मुलींची ४, तसेच औसा, निलंगा, उदगीर, देवणी व चाकूर येथे प्रत्येकी मुलांचे एक व मुलींचे एक, अहमदपूर येथे मुलांची दोन व मुलींची दोन आणि रेणापूर येथे मुलांचे एक व जळकोट येथे मुलींचे एक वसतिगृह समाविष्ट आहे. या सर्व वसतिगृहांची सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे.
इयत्ता अकरावी, बारावीसह बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांचे अर्ज मागील शैक्षणिक वर्षातील त्रुटी किंवा तांत्रिक अडचणींमुळे चालू शैक्षणिक वर्षात भरताना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या समस्येचे निवारण करून विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुलभतेने भरता यावा, याकरिता गृहपाल व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या लॉगिनमध्ये ‘स्पॉट ॲडमिशन’ हा नवीन टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत, त्यांनी आपल्या जवळच्या शासकीय वसतिगृहामध्ये किंवा समाज कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन २० ऑक्टोबर २०२६ पूर्वी स्पॉट ॲडमिशनसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी २३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत https://hmasnew.mahait.org या नवीन संकेतस्थळ लिंकचा वापर करून आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करणे बंधनकारक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी वसतिगृहात ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर केला असेल, त्यांनादेखील आता ऑनलाईन अर्ज भरणे अनिवार्य असून, ऑनलाईन अर्ज न भरल्यास विद्यार्थी वसतिगृह प्रवेश अथवा स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहतील.
शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांचा जागेअभावी वसतिगृहात प्रवेश निश्चित न झाल्यास, अशा सर्व पात्र विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने अंतर्गत निवास व भोजन भत्ता ऑनलाईन पद्धतीने मंजूर करण्यात येतो. वसतिगृह प्रवेशासाठी निवड न झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज थेट स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने वर्ग केले जातात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशाचा अर्ज भरलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध असणार नाही व त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. सुविधेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी तातडीने स्थानिक गृहप्रमुख तथा गृहपाल यांच्याशी संपर्क साधून आपले प्रवेश अर्ज मुदतीत भरावेत, असे आवाहन लातूर येथील समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment