‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात लोकसहभाग आवश्यक - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात लोकसहभाग आवश्यक
- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
· 17 सप्टेंबर रोजी घेतली जाणार स्वच्छतेची शपथ
· प्रत्येक ग्रामपंचायतीने सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन
· शहरी भागात स्वच्छतेसाठी घेतली जाणार स्वयंसेवी संस्थांची मदत
लातूर, दि. १२ (जिमाका): जिल्ह्यात १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होवून आपला परिसर स्वच्छ करावा. तसेच हे अभियान लोकचळवळ बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. या अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण सुमंत, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे यावेळी उपस्थित होते.
मराठवाडा मुक्तिदिनी १७ सप्टेंबर रोजी ध्वजारोहणानंतर सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेवून आपला परिसर, गाव, शहर स्वच्छ करण्यासाठी कृतीशील प्रयत्न करावेत. तसेच यादिवशी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी स्वच्छता विषयक संदेश देण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करावे. लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देवून आपले गाव, शहर स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती करावी. यासोबतच प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या. शहरी भागामध्ये सर्वाधिक कचरा जमा होणाऱ्या परिसरात विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. तसेच रस्ते, चौक सुशोभीकरणासाठी विविध संस्था, खासगी आस्थापना यांचे सहकार्य घेवून आवश्यक कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.
स्वच्छता ही सेवा अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था, ग्रामपंचायती यांचा प्रजासत्ताक दिनी गौरव करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छता क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, व्यक्ती यांनीही जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले. शहरी आणि ग्रामीण भागात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा यावेळी जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. तालुकास्तरीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते.
*****
Comments
Post a Comment