‘एनसीडीसी’मार्फत जिल्ह्यातील मच्छिमारांना मार्गदर्शन

 

‘एनसीडीसी’मार्फत जिल्ह्यातील मच्छिमारांना मार्गदर्शन

लातूर, दि.25 (जिमाका) :   ‘एनसीडीसीचे’ लक्ष्मणराव इनामदार नॅशनल अकॅडमी फॉर को-ऑपरेटिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र आणि केंद्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभाग, दयानंद विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मच्छीमारासाठी मंगळवारी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.  

पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत आयोजित या कार्यशाळेला प्रशिक्षणादरम्यान महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त शिरीष गाताडे, सहाय्यक आयुक्त तेजस्विनी कराळे व दयानंद महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. एस. बेल्लाळे, पुणे राष्ट्रीय सहकारी विकास निगम उपनिदेशक सुनिल शिंदे, तसेच जिल्ह्यातील मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय सहकारी विकास निगमचे उपनिदेशक गणेश गायकवाड यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून मान्यवरांचे स्वागत केले.

दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. एस. बेल्लाळे यांनी पाण्याचे महत्व सांगताना जलसंपत्ती व मत्स्यपालनाचे महत्त्व अधोरेखित केले. गुणवत्तापूर्ण बीजनिर्मिती, बीज संकलन, त्याची उपलब्धता मत्स्य व्यवसायातील यशाचा गाभा आहे. मच्छीमार बांधवांनी कोल्ड स्टोरेज, मत्स्य विपणन, माशांची बाजार पेठेतील उपलब्धता या बाबीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मत्स्यवस्थेत महिलांचे प्रमाण अत्यल्प असून महिलांनी एकत्र येऊन मत्स्य सोसायट्या स्थापन करायला हव्यात ,असेही त्यांनी सांगितले. मच्छीमार बांधवांनी पारंपारिकतेला आधुनिकतेची आणि तंत्रज्ञानाची जोड द्यावी,  असेही ते म्हणाले.

मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थांसाठी असलेल्या विविध योजनांसाठी प्रस्ताव तयार करण्याबाबत यासंदर्भात ठाणे जिल्हा मत्स्य व्यवसाय सहकारी संघाचे अमोल साळगावकर यांनी मार्गदर्शन केले. मच्छीमार बांधवांसाठी झालेल्या सादरीकरणांमध्ये प्रादेशिक उपआयुक्त शिरीष गाताडे यांनी मत्स्य व्यवसाय यांना किसान क्रेडिट कार्ड, अपघात गटविमा तसेच पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या विविध योजनांची तपशीलवार माहिती श्री. गायकवाड यांनी दिली. प्रशिक्षणादरम्यान महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी सय्यद हमजा यांनी मच्छीमार बांधवांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यंग प्रोफेशनल आशिष सिरसाट यांनी आभार मानले. 

**** 




 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु