प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले लातूर जिल्ह्यातील १९ आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन

   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले लातूर जिल्ह्यातील १९ आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन


• महाविद्यालयातील युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्यासाठी उपक्रम

 लातूर, दि. २० : महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आचार्य चाणक्य कोशल्य विकास केंद्र योजनाचे वर्धा येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये लातूर जिल्ह्यातील १९ महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्रांचाही समावेश आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचाही शुभारंभ करण्यात आला.

वर्धा येथील कार्यक्रमात राज्यपाल डॉ.सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी, केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री  मंगलप्रभात लोढा आदींची उपस्थिती होती.

लातूर येथील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी (कॉक्सिट) येथे झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बालाजी मरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आले आहे. याअनुषंगाने १५ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींना कौशल्य विकासाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही नाविन्यपूर्ण योजना राज्य शासनाने सुरु केली आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते या योजनेचा आज ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला.

लातूर जिल्ह्यातील लातूर येथील ब्रीलीयंट महाविद्यालय,  महिला बीसीए महाविद्यालय, जयक्रांती आर्टस् अँड कॉमर्स सिनियर कॉलेज, कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी (कॉक्सिट), एम.एस.बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स एमआयएमएसआर मेडिकल कॉलेज अँड वाय.सी.आर. हॉस्पिटल कॅम्पस, कन्हेरी येथील मांजरा महाविद्यालय, मुरुड येथील संभाजी कॉलेज, चाकूर येथील डी. बी. कॉलेज ऑफ फार्मसी, हाडोळती येथील कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालय, चापोली येथील संजीवनी महाविद्यालय, उदगीर येथील मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ, शिवाजी महाविद्यालय, श्री हावगी स्वामी कॉलेज, निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालय, औसा येथील कुमारस्वामी महाविद्यालय, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालय, जळकोट येथील संभाजीराव केंद्रे महाविद्यालय आणि शिरूर अनंतपाळ येथील शिवनेरी महाविद्यालयातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे यावेळी उद्घाटन झाले. या सर्व महाविद्यालयांमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

प्रत्येक कौशल्य विकास केंद्रात प्रतिवर्षी साधारण १५० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक फायदा राज्यातील युवक-युवतींना व्हावा, या दृष्टीकोनातून राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करून महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
*** 



Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु