मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्याला आधार सीडिंगची कार्यवाही तातडीने करावी - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्याला

आधार सीडिंगची कार्यवाही तातडीने करावी

- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

·         अंगणवाडी कार्यकर्तीच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला माहिती द्यावी

 लातूर, दि. २३ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दुसऱ्या टप्प्यात अर्ज सादर केलेल्या अनेक पात्र महिलांनी आपल्या बँक खात्याला आधार क्रमांक संलग्न (आधार सीडिंग) केलेले नाही. या योजनेच्या लाभाची रक्कम आधार संलग्न बँक खात्यात जमा होत असल्याने सर्व पात्र लाभार्थी महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाला संलग्न करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावीअशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्याला आधार क्रमांक संलग्न करण्याच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागरजिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेखसमाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रमोद शिंदे यावेळी उपस्थित होते. तसेच सर्व गट विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तसेच बँकांचे जिल्हा समन्वयक दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते.

बँक खात्याला आधार क्रमांक संलग्न नसलेल्या पात्र लाभार्थी महिलांची गावनिहाय यादी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. गट विकास अधिकारी आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी समन्वयाने काम करून ही यादी संबंधित गावातील अंगणवाडी कार्यकर्ती यांना उपलब्ध करून द्यावी. अंगणवाडी कार्यकर्ती यांनी संबंधित पात्र महिलांना याबाबत अवगत करून त्यांना बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करण्यासाठी मार्गदर्शन करावे, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या.

सर्व गट विकास अधिकारी आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी समन्वयाने काम करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांना आधार संलग्न करण्याची कार्यवाही येत्या तीन दिवसात पूर्ण करावी. यासाठी प्रत्येक गावामध्ये दवंडी देवून जनजागृती करावी. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न नसलेल्या पात्र महिलांची यादी उपलब्ध करून द्यावी, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी सांगितले.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख यांनी बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करण्याच्या कार्यवाहीबाबत यावेळी माहिती दिली.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचाही यावेळी आढावा घेण्यात आला. प्रत्येक गट विकास अधिकारी यांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची यादी तातडीने जिल्हास्तरावर पाठविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा