नदी काठावरील गावांमध्ये खबरदारीच्या उपाययोजना तातडीने सुरू करा- पालकमंत्री गिरीश महाजन

 नदी काठावरील गावांमध्ये खबरदारीच्या उपाययोजना तातडीने सुरू करा- पालकमंत्री गिरीश महाजन


▪️जिल्ह्यात पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा
▪️पूर प्रवण गावातील पूर्वतयारीची घेतली माहिती

लातूर, दि. 25 : जिल्ह्यात 24 सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे नद्या, सिंचन प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे निर्माण होणारी संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेवून खबरदारीच्या उपाययोजना तातडीने सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या. जिल्ह्यात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा त्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला.

पुराचा धोका असलेल्या गावांमधे प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

तेरणा आणि मांजरा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग, तसेच इतर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या सर्व नद्यांच्या काठावरील गावांमध्ये खबरदारीच्या उपाययोजना तातडीने सुरू कराव्यात. आवश्यकता असल्यास नागरिकांचे तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतरण करून त्यांना आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी. कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले.

संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेवून गावनिहाय शोध पथके, आरोग्य पथके सज्ज ठेवावीत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज ठेवावी. यामध्ये कोणताही विलंब होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. गाव ते जिल्हा पातळीवरील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी सतर्क राहून सातत्याने परिस्थितीचा आढावा घेवून आवश्यक उपाययोजना कराव्यात. तलावांची पाणी पातळी, सांडवा, भिंत यावर सातत्याने लक्ष ठेवून कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची काळजी घ्यावी, असे पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले.

नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत

जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करावेत. तसेच घरांची पडझड किंवा पशुधनाची हानी झाली असल्यास त्याबाबत आवश्यक कार्यवाही तातडीने करून बाधितांना मदत उपलब्ध करून द्यावी. पुरामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करावे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, असे पालकमंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

पूर परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. तसेच सर्व संबंधित अधिकारी यांना प्रत्यक्ष फिल्डवर नुकसानीची व पूर परिस्थितीचा आढावा घेत आहेत. सर्व विभागांच्या समन्वयाने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी सांगितले.

नदी काठावरील गावांमध्ये दवंडीच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. तसेच पूर परिस्थिती निर्माण झाल्यास बाधित होणाऱ्या कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी दिली.
***

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा