आठ भाग्यवान लाडक्या बहिणींच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण
आठ भाग्यवान लाडक्या बहिणींच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण
उदगीर, दि. 4 (जिमाका) :- लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आयोजित महिला सशक्तीकरण अभियानात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आठ लाभार्थ्यांचा साडी, गुलाबपुष्प आणि प्रतिकात्मक धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. भारताच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आपला सन्मान होत आहे, हे अविश्वसनीय आहे, अशा भावना लाभार्थींनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील श्रीमती शिल्पा संतोष राठोड, श्रीमती स्वाती कासले, श्रीमती कल्पना सोनकांबळे, श्रीमती प्रियंका भोसले, श्रीमती प्रियंका जगताप या पाच लाभार्थींना गुलाबपुष्प, साडी आणि प्रतिकात्मक धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत श्रीमती नागमणी शिवाजी मलकापूरे यांना दोन मजली घराची प्रतीकात्मक चावी, साडी, गुलाब पुष्प व सुरेखा सुतार यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाअंतर्गत साडे चार लाखांचा प्रतिकात्मक धनादेश, साडी व पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते गौरवण्यात आले. तर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थी श्रीमती गजराबाई अंधारे यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.
आपण स्वप्नातही कधी विचार केला नव्हता की, राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते आमचा सत्कार करण्यात येईल. आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, आमचा राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते साडी धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. हे आमच्यासाठी अविश्वसनीय आहे. हे सर्व आमचे लाडके भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे शक्य झाले आहे. आमच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण आहे. त्यामुळे आमचे लाडके भाऊ मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार.
***
Comments
Post a Comment