बंजारा बोलीभाषा-मराठी प्रमाणभाषा कृति पुस्तिकेचे प्रकाशन प्रत्येक शनिवारी वाडी-तांड्यावरील विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग - अनमोल सागर

 बंजारा बोलीभाषा-मराठी प्रमाणभाषा कृति पुस्तिकेचे प्रकाशन

प्रत्येक शनिवारी वाडी-तांड्यावरील विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग

-         अनमोल सागर

·        वाडी-तांड्यावरील विद्यार्थ्यांशी शिक्षक साधणार बोलीभाषेत संवाद !

 लातूर, दि. २७ (जिमाका) : विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर वाढविण्यासाठी त्यांच्या मातृभाषेतील शिक्षण उपयुक्त ठरते. आपल्या मराठीमध्ये विविध बोलीभाषा असून शाळेमध्ये शिक्षकांनी प्रमाण भाषेसोबत बोलीभाषेत संवाद साधल्यास विद्यार्थ्यांना चांगले आकलन होते. त्यामुळे जिल्ह्यातील वाडी-तांड्याच्या ठिकाणी असलेल्या शाळांमध्ये प्रत्येक शनिवारी बोलीभाषेत शिक्षणासाठी विशेष वर्ग घेतले जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी सांगितले.

मुरुड येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या बंजारा बोलीभाषा-मराठी प्रमाणभाषा कृति पुस्तिकेच्या प्रकाशनप्रसंगी श्री. सागर बोलत होते. श्रीकिशन सोमाणी विद्यालयात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. भागीरथी गिरी, प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या संचालक डॉ. सुनिता राठोड, शिक्षणाधिकारी नागेश मापारी, डॉ. अशोक पवार, श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचे सचिव कमल किशोर अग्रवाल, उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार यावेळी उपस्थित होते.

मानवाच्या प्रगतीमध्ये भाषेला अतिशय महत्व आहे. भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नसून संस्कृती, परंपरेचे जतन भाषेमुळे होते. एखादी भाषा लोप पावली तर त्या भाषेशी निगडीत संस्कृतीचाही ऱ्हास होतो. त्यामुळे बोलीभाषा जपणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील तांड्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेसोबतच त्यांची बोलीभाषा असलेल्या बंजारा भाषेत शिक्षणाचे धडे देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी बंजारा बोलीभाषा ते मराठी प्रमाणभाषा या कृति पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली आहे. वाडी-तांड्यावर ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांसाठी ही पुस्तिका उपयुक्त ठरेल, असे श्री. सागर म्हणाले. तसेच २८ सप्टेंबरपासून दर शनिवारी तांड्यावरील शाळेतील मुलांना बंजारा भाषेत शिक्षण देण्यासाठी विशेष उपक्रमाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यांच्या आकलनामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी बंजारा बोलीभाषा-मराठी प्रमाणभाषा कृति पुस्तिका उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे तांड्यावरील विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरामध्ये वाढ होण्यास मदत होईल. जिल्ह्यातील जवळपास १५८ तांड्यावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम फायदेशीर ठरणार असल्याचे मत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. भागीरथी गिरी यांनी व्यक्त केले.

प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या संचालक डॉ. सुनिता राठोड, शिक्षणाधिकारी नागेश मापारी, डॉ. अशोक पवार, श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचे सचिव कमल किशोर अग्रवाल, उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे जिल्हा समन्वयक सतीश भापकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी बंजारा बोलीभाषा-मराठी प्रमाणभाषा कृति पुस्तिका, अध्ययन स्तर कृति पुस्तिका या दोन पुस्तिकांचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. बंजारा बोलीभाषा-मराठी प्रमाणभाषा कृति पुस्तिका निर्मितीसाठी योगदान दिलेल्या शिक्षकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हरंगुळ येथील तांड्यावरील विद्यार्थिनींनी यावेळी बंजारा भाषेतील गीताने मान्यवरांचे स्वागत केले. तसेच आरुषी राठोड, श्रावणी चव्हाण या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकामध्ये संतोष ठाकूर यांनी बंजारा बोलीभाषा-मराठी प्रमाणभाषा कृति पुस्तिका निर्मिती मागील संकल्पना विषद केली. पुस्तिकेच्या लेखनात सहभागी झालेले प्राथमिक पदवीधर शिक्षक सूर्यकांत बोईनवाद, प्राथमिक शिक्षिका श्रीमती कविता गुट्टेवाडीकर यांनीही आपले अनुभव कथन केले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. जगन्नाथ कापसे यांनी आभार मानले.

***** 




Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु