पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
लातूर जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
लातूर, दि. २१ : जिल्ह्यात ०५ औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-२०२६ करिता २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. ही मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत, निर्भिड वातावरणात पार पडावी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ नुसार जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरामध्ये निर्बंध लागू केले आहेत.
यानुसार मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरामध्ये तात्पुरते मंडप किंवा दुकाने उभारण्यास, तसेच निवडणूक कामाव्यतिरिक्त खाजगी वाहने आणण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात मोबाईल फोन, स्मार्ट फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, लाउडस्पीकर आणि इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेशी संबंधित नसलेल्या कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला या परिसरात प्रवेशास बंदी असेल, तसेच राजकीय पक्षांच्या चिन्हांचे प्रदर्शन करण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
सद्यस्थितीत सर्व संबंधितांना स्वतंत्र नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेणे शक्य नसल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (२) मधील अधिकारांचा वापर करून हा एकतर्फी आदेश निर्गमित केला आहे. लातूर जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघासाठी हे मनाई आदेश २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान सुरू झाल्यापासून ते मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील, असे याबाबतच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
****
Comments
Post a Comment